Uddhav Thackeary on India-Pakistan Match: आशिया चषकात भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला देशभरातून विरोध झाला. राजकीय पक्ष आणि सोशल मीडियावरून विरोध दर्शवला असतानाही रविवारी (१४ सप्टेंबर) हा सामना पार पडला. या सामन्यानंतर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेने (ठाकरे) या सामन्याविरोधात तीव्र आंदोलन केले होते. आता यावर शिवसेनेचे (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
आज मातोश्री येथे काही पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही, याची चर्चा असल्याचा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला.
यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “भारतीय जनता पक्षाला मी बोगस जनता पार्टी म्हणतो. त्यांचे देशभक्तीचे ढोंग उघडे पडले आहे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करतात. पण अमित शाहांचा मुलगा जय शाह याच्या हट्टापायी पाकिस्तानबरोबर सामना खेळावा लागला. यामुळे देशाच्या प्रतिमेचा चुराडा झाला. कणखर भूमिका दाखवायला हवी होती. एक सामना खेळलो नसतो, आशिया कपमध्ये सहभागी झालो नसतो, तर काय झाले असते?”
“पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरात पाठवले होते. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद उघडा पाडण्यासाठी शिष्टमंडळे पाठवली गेली. पण शिष्टमंडळाला तिथे काय प्रतिसाद मिळाला? यावर काहीही माहिती दिली नाही. पण तिथे खासदारांनी काय सांगितले असावे, तर पाकिस्तान दहशतवादी हल्ले करतो. मग तरीही जगातील देश भारताच्या पाठिशी उभी का राहिले नाहीत?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
म्हणून देश आपल्यापाठी उभी राहत नाहीत
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “जगातील देश भारताच्या पाठिशी उभी का राहिले नाहीत? याचे उत्तर आता मिळाले आहे. कारण आपण ज्या तोंडाने पाकिस्तानवर दहशतवादाचा आरोप करतो, त्यानंतर दोन-चार महिन्यातच त्याच पाकिस्तानशी आपण क्रिकेट खेळणार असू, तर जग आपल्याकडे संशयाच्या नजरेने पाहणारच. पाकिस्तान आपला मित्र आहे की शत्रू? हे आपण एकदा ठरवून जगाला तसे दाखवून दिले पाहिजे.”
पाकिस्तानविरोधात भूमिका घ्यायची आणि प्रमुख नेत्यांनीच पाकिस्तानमध्ये जाऊन केक खाऊन यायचे, ही परराष्ट्र नीती देशाला तारक आहे, असे मला वाटत नाही. ही नीती घातक आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.