“शेवटी गाढव तो गाढव. त्यामुळे घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत जी गाढवं होती त्या गाढवांनी लाथ मारायच्या आधी आम्ही त्यांना लाथ मारुन बाहेर पडलो आहोत,” असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी शिवसेनेचे हिंदुत्व हे गधाधारी असल्याचे म्हणत शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. आता फडणवीसांच्या याच टीकेला ठाकरे यांनी वरील शब्दांत उत्तर दिले.

हेही वाचा >> ‘केतकी चितळे कोण, मी तिला ओळखत नाही’, शरद पवारांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(शनिवार) सायंकाळी एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वांद्रे पूर्व येथे जाहीर सभेत बोलत होते. यावेळी बोलताना “खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता. ते देशाची दिशा भरकटवत आहेत. मला आज मोठी गदा दिली. याआधी मी बोललो होतो की आमचं हिंदुत्व कसं आहे हे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं. ते म्हणाले होते मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर तो अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे. हाच धागा घेऊन आपण पुढे जात आहोत. मी म्हटलं होतं आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. बाकीच्यांचे घंटाधारी आहे. गदा पेलायला हातात ताकत पाहीजे. त्याच्यावर दवेंद्र फडणवीस बोलले शिवसेनेचं हिंदुत्व गदाधारी नाही तर गधाधारी आहे,” अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करुन दिली.

हेही वाचा >> “या अशा चार-दोन विकृत टाळक्यांमुळे…”, राज ठाकरेंनी शरद पवारांविषयीच्या ‘त्या’ पोस्टवरून केतकी चितळेला सुनावलं!

तसेच पुढे बोलताना भाजपाला गाढव म्हणत त्यांनी फडवीसांवर टीकेचे आसूड ओढले. “अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं. आमचे काही जुने फोटो तुमच्याबरोबरचे येत आहेत, त्यामुळे तुमचा गैरसमज झाला असेल की आमचे हिंदुत्व गधाधारी आहे. त्या गध्याला आम्ही सोडून दिलं आहे. कारण उपयोग नाही त्याचा. शेवटी गाढव ते गाढव. त्यामुळे घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत जी गाढवं होती त्या गाढवांनी लाथ मारायच्या आधी आम्ही त्यांना लाथ मारुन बाहेर पडलो आहोत,” असे बोचरे वार उद्धव ठाकरे यांनी केले.

हेही वाचा >> शरद पवारांनी नारायण राणे, चंद्रकांत पाटलांना लगावला टोला, म्हणाले…

तसेच पुढे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने भाजपाला सोडण्याचा निर्णय योग्य होता हे पुन्हा एकदा सांगितले. तसेच त्यांनी पेट्रोल, डिझेल दरवाढ, महागाई या मुद्द्यांवरुनही भाजपाला लक्ष्य केले.