Uddhav Thackeray : जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, परंपरेप्रमाणे मी सर्वांना विजयादशमीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. जिवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यातलं सोनं असतं. काही लोकांना भाजपाने पळवलं. जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच आहे. वाघाचं कातडं पांघरणाऱ्या गाढवाची गोष्ट आपल्याला माहीत आहे. पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी पहिल्यांदा पाहिलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता टीका केली. तसंच अमित शाह यांचे जोडे त्यांना लखलाभ होवोत असंही उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याच्या भाषणात म्हणाले.
चिखल झाला सगळीकडे कारण कमळाबाई
आज सगळीकडे चिखल झाला आहे, याचं कारण कमळाबाई. स्वतःच्या कारभाराने कमळाबाईने स्वतःचं सगळं चांगलं करुन घेतलं आहे आणि जनतेच्या आयुष्याचा चिखल झाला आहे. शेतकऱ्यांची शेतजमीन वाहून गेली आहे. घरादारांमध्ये चिखल घुसला आहे. शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो तो विचारतो आहे की आम्ही खायचं काय? एवढंमोठं संकट आपण कधी पाहिलेलं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आजचे मुख्यमंत्री विरोधात होते तेव्हा बोंबलत होते की ओला दुष्काळ जाहीर करा
आजचे मुख्यमंत्री आहेत ते बदलले. आपलं सरकार होतं तेव्हा हेच बोंबलत होते की ओला दुष्काळ जाहीर करा. आता म्हणत आहेत की ओला दुष्काळ ही संज्ञाच नाही. खड्ड्यात घाला तुमची संज्ञा पण शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत झालीच पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केली आहे. आपलं सरकार असताना मी कर्तव्य म्हणून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. कालबद्ध स्वरुपात ती पूर्णही केली होती. अजून यांची २०१७ मधली कर्जमुक्ती अजून होते आहे. शेतकरी अजून वाट बघत आहेत की ती कर्जमुक्ती कधी होणार? असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आपण शेतकऱ्यांना मदत करायला सुरुवात केली होती. पण गद्दारांनी त्यांची राशी पळवल्या आणि सुरत आणि गुवाहाटीला पळाले असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवलं गेलं-उद्धव ठाकरे
संघाला १०० वर्षे झाली आहेत. ही काही थोडीथोडकी वर्षे नाहीत. संघाच्या शंभरीला गांधी जयंंती आहे. हा काय योगायोग आहे का? मला कळत नाही. जशी संघाला १०० वर्षे झाली आहेत. आता लढणारी माणसं आता कमी झाली आहेत. जो लढेल तो तुरुंगात जाईल अशी वाटचाल आणि नीती या सरकारची आहे. सोनम वांगचुक या माणसाने अत्यंत दुर्गम भागात हाडं मोडणाऱ्या थंडीत आपले जवान नीटनेटके रहावेत म्हणून सोलार टेन्कॉलॉजीवर छावण्या बांधून दिल्या. पाण्याचं दुर्भिक्ष्य होऊ नये म्हणून आईस स्तुपाची योजना आणली. त्याने न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन सुरु केलं. लेह लडाखसाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरु केलं. त्यानंतर सगळे पेटले, लेह लडाखमध्ये सुरु झालं. त्यानंतर मोदीबाबांनी त्यांना उचलून रासुका खाली त्यांना अटक केली आणि तुरुंगात टाकलं. मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत ते देशद्रोही नव्हते. शिष्टमंडळातर्फे ते पाकिस्तानला गेले म्हणून त्यांना देशद्रोही ठरवलं गेलं अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली.