Uddhav Thackeray Dasara Melava 2023 Marathi News: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा पाहायला मिळाली ती शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या मेळाव्यांची. आधी दोन्ही गटांकडून शिवाजी पार्कच्या जागेसाठी अर्ज करण्यात आला होता. नंतर शिंदे गटानं अर्ज मागे घेतला व आझाद मैदानावर सभेचं नियोजन केलं. आज मुंबईत दोन्ही गटांच्या दसरा मेळावा सभा होत असताना तिथे होणाऱ्या भाषणांमधून एकमेकांवर टीका-टिप्पणीची एकही संधी नेत्यांनी सोडली नाही. त्याचाच प्रत्यय ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या भाषणात आला. भास्कर जाधव यांनी तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच नक्कल करत त्यांच्यावर हल्लाबोल केला.

काय म्हणाले भास्कर जाधव?

भास्कर जाधव यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करत खोचक टीका केली. “२०१४ साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नसताना भाषणाला यायचे तेव्हा स्टेजवर एखाद्या हिरोसारखे यायचे आणि डाव्या हाताने लोकांना अभिवादन करायचे. इथे आल्यानंतर त्यांची सुरुवात व्हायची…’अच्छे दिsssन.. ‘ की लगेच झालं. समोरून लोक म्हणायचे ‘आयेंगे’. १५ लाखांपासून यांनी सगळी आश्वासनं दिली. अशी आश्वासनं देऊन २०१४ ची लोकसभा निवडणूक जिंकली”, असं भास्कर जाधव म्हणाले.

“महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ होऊ द्यायचा नाही म्हणून…”, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

“२०१९ साली पुलवामामध्ये ४० जवान मारले गेले. जेव्हा जवान तिथे मारले जात होते, तेव्हा देशाचे पंतप्रधान त्यांच्यावरच्या एका सिनेमासाठी पोज देण्यात व्यग्र होते. त्यांच्याच पक्षाते तत्कालीन काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल सिंह म्हणाले की ‘मी सांगितलं होतं की या जवानांना जमिनीवरून पाठवू नका. विमान द्या. पण पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गृहमंत्र्यांनी एकही विमान दिलं नाही. ४० जवान मारले गेले. मग पंतप्रधान म्हणाले ‘हम घुस के मारेंगे’. मग सांगितलं बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक केला. किती अतिरेकी मारले गेले, यावर संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यानं खुलासा केला नाही तर अमित शाह त्याबद्दल खुलासा करत होते”, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रातील भाजाप सरकारवर हल्लाबोल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“असा अहंकारी नेता देशाच्या पंतप्रधानपदी असता कामा नये”

“जवानांच्या बलिदानाचा देशाच्या पंतप्रधानांनी निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी फायदा करून घेतला. आता २०२४ साली ते पुन्हा निवडणुकीला उभे राहिले आहेत. त्यांनी पुन्हा लाल किल्ल्यावरून सांगितलं की ‘पुन्हा पंतप्रधान मीच होणार’. असा अहंकारी नेता देशाच्या पंतप्रधानपदी असता कामा नये. पण त्यांना हे माहिती नाही की यावेळी शिवसेना त्यांच्याबरोबर नाही. ते पदच्युत झाल्याशिवाय राहणार नाही”, असं भास्कर जाधव म्हणाले.