विप्लव बजोरिया आणि मनीषा कायंदे यांच्या रुपात विधानपरिषदेतील ठाकरे गटाचे दोन नेते आधीच शिंदे गटात दाखल झाले आहेत. आता थेट विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिंदे गटात दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शुक्रवारी संध्याकाळी नीलम गोऱ्हेंचा पक्षप्रवेश होणार असून त्यांच्यासमवेत विधानपरिषदेतील आणखी एक आमदारही प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहाचे चारही प्रमुख सत्ताधारी पक्षांत असतील.
नीलम गोऱ्हे या शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. यासंदर्भात अनेक तर्क-वितर्क लढवले जात असताना खुद्द नीलम गोऱ्हे यांच्याकडून मात्र अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे यासंदर्भातल्या तर्क-वितर्कांना अधिकच बळ मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र टीव्ही ९ ला प्रतिक्रिया देताना ही शक्यता फेटाळून लावली आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे?
अंबादास दानवेंनी मात्र नीलम गोऱ्हे शिंदे गटात जातील असं वाटत नसल्याचं म्हटलं आहे. “नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणं असं काही होईल असं वाटत नाही. नीलम गोऱ्हे लढाऊ नेत्या आहेत. त्यामुळे अशी चर्चा करण्याचं काही कारण नाही”, असं दानवे म्हणाले आहेत.