लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. म्हणूनच महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वेगवेगळ्याा पक्षाचे नेते आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतायत. आज (९ मार्च) पुणे जिल्ह्यातील हरिश्चंद्री येथे महाविकास आघाडीची एक जाहीर सभा झाली. या सभेत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) तसेच राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) महत्त्वाचे नेते उपस्थित होते. याच सभेत संजय राऊतांनी सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादीवर (अजित पवार गट) सडकून टीका केली.
संजय राऊतांनी वाचून दाखवली कविता
संजय राऊतांनी आपल्या भाषणात एक कविता वाचून दाखवली. “भाजपाला विकास करायला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची माणसं लागतात. माझ्या वाचनात एक सुंदर कविता आली. नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला. त्याच्याकडून जमेना म्हणून बारामतीचा बघितला. तो पुरेना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला. बघू आतातरी कमळाबाईच्या पोटी विकास जन्माला येतो का?” असं संजय राऊत म्हणाले. तसेच गेल्या ७० वर्षांत महाराष्ट्राचा, देशाचा विकास झाला. हा विकास काँग्रेसने केला, असे म्हणत त्यांनी काँग्रेसची प्रशंसा केली.
राऊतांची अमित शाह, भाजपावर टीका
संजय राऊतांनी भाजपाच्या धोरणावरही टीका केली. “अमित शाह महाराष्ट्रात आले आणि म्हणाले की यावेळी मिशन ४५. पण अमित शाहांनी मिशनच्या गोष्टी करू नये. त्यांनी कमिशनच्या गोष्टी कराव्यात. भाजपा हा कमिशनवर पोसलेला पक्ष आहेत. या राज्यातील प्रत्येक जागा आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिंकू. महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या मागे तिन्ही पक्ष ठामपणे उभे राहतील. त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. त्यांनी ४-५ जागा जिंकल्या तरी पुरे झाले. तेवढीच लाज राहील. देशाचे पंतप्रधान म्हणतात अबकी बार ४०० पार. त्याच्या बापाचे राज्य आहे का?” असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.