Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Offer: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची आमदारकीची टर्म ऑगस्ट महिन्यात संपत आहे. त्यामुळे या अखेरच्या अधिवेशनात त्यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून निरोप देण्यात आला. निरोपाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्ताधारी बाकावर येण्याची ऑफर दिली. “तुम्हाला इथे यायला स्कोप आहे. जर यायचे असल्यास त्याप्रमाणे विचार करता येईल”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यानंतर आता राजकारण विविध चर्चांना उधाण आले आहे.
प्रसंग बडा बाका – ठाकरे
दरम्यान उद्धव ठाकरे यांना याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विधिमंडळातून बाहेर पडताना माध्यमांनी फडणवीस यांनी दिलेल्या ऑफरबद्दल उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, हा प्रश्न नुसता बाकाचा नाही तर प्रसंग बडा बाका आहे. सभागृहात काही गोष्टी खेळीमेळीने होत असतात. त्या खेळीमेळीने घ्यायला हव्यात.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी आज आनंदराज आंबेडकर यांनी युती केली. ही युती करताना त्यांनी मी अधूनमधून ऑपरेशन (राजकीय) करत असतो असा उल्लेख केला. याबद्दल उद्धव ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले, ऑपरेशनचा माझ्याएवढा अनुभव त्यांना (एकनाथ शिंदे) नाही.
तसेच एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणालाही त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो हे माझ्या वडिलांची आणि आजोबांची पुण्याई आहे. पण ज्यांनी त्यांना (शिंदे) सोन्याच्या चमच्याने भरवले, त्या अन्नाशी त्यांनी प्रतारणा केली. हे पाप जनता विसरू शकणार नाही.
भाजपात घेण्यासाठी आरोप माफ केले
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, नाशिकमध्ये भाजपात काही लोकांना घेण्यासाठी त्यांच्यावरी आरोप माफ करण्यात आले आहेत. १५ ते २० दिवसांपूर्वी ज्यांच्याविरोधात आरोप झाले होते, म्हणून त्यांना आम्ही काढले, त्याच लोकांना आरोप मागे घेऊन भाजपात घेतले जात आहे. इतकी नीतीमत्ता खालावली असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.