Uddhav Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी डोममध्ये आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली.

तसेच यावेळी राज्यातील आणि देशभरातील मतदार याद्यामधील घोळांबाबत आणि बोगस मतदाराच्या मुद्यांवरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. यामध्ये निवडणूक आयुक्तांवरही गुन्हा दाखल होऊन त्यांना सजा झाली पाहिजे, असं म्हणत आमचं सरकार आल्यानंतर आम्ही निवडणूक आयुक्तांवर खटला भरणार असल्याचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष, कसला? भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशभक्तांची ही बोगस टोळी आहे. स्वत:च स्वत:ला देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि बोगस देश प्रेम दाखवायचं. आत्मनिर्भर भारत करणार आहे असं सांगतात. अजून आत्मनिर्भर भाजपा होत नाही, लोक चोरावे लागतात, पक्ष चोरावे लागतात, पक्ष फोडावे लागतात. मते चोरावी लागतात आणि म्हणे की आत्मनिर्भर? हे कसले आत्मनिर्भर?”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

उद्धव ठाकरेंचं महायुतीला खुलं आव्हान

“आरे खुल्या मैदानात या ना, तुम्ही मर्दाची औलाद असाल तर खुल्या मैदानात या आणि नामर्दाचाची औलाद असाल तर मतचोरी करून या. आता भाजपाने काय करायचं ते ठरवावं? आम्ही मर्दाची औलाद आहोत, आम्ही लढणारे आहोत”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीला खुलं आव्हान दिलं आहे.

‘निवडणूक आयुक्तांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे’

“ईव्हीएम मध्ये गडबड होते याबाबत असणारा संशय अजूनही आहे, तो संशय गेलेला नाही. यातच आता निवडणूक आयोगाने जाहीर केलं की महापालिकेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाही. मग निवडणूक कशाची घेणार? बोगस मतदार मतदान करून निघून जाणार, तुम्हाला वाटेल तसे तुम्ही निर्णय देणार? आणि आम्ही काही केलं तर आमच्यावर कायद्याचा बडगा उगारणार? मग माझं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाच्या आयुक्तांवरही केस (गुन्हा) केली पाहिजे. निवडणूक आयुक्तांनाही सजा झाली पाहिजे”, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

‘एकदा आमचं सरकार आलं, तर…’

“कारण कायद्यासमोर सर्व सारखे आहेत. आम्ही गुन्हा केला तर कायद्याच्या कचाट्यात सापडत असू तर मग निवडणूक आयुक्तांना देखील सजा झालीच पाहिजे. पुढच्या लोकसभेला अद्याप वेळ आहे, आता त्यांचे दिवस असतील पण चोरून घेतलेले, पण उद्याचे दिवस आमचे असणार आहेत. एकदा आमचं सरकार आलं, तर निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करून न्यायालयासमोर उभा करू”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.