१७ मार्च या दिवशी शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीची सभा पार पडली. या सभेला इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर कडाडून टीका केली. तसंच त्यांच्याआधी उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं. त्यांनीही मोदी आणि भाजपाचा समाचार घेतला. शिवतीर्थावर भाषण करताना उद्धव ठाकरे हे कायमच जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूंनो, मातांनो आणि भगिनींनो अशी सुरुवात करतात. मात्र या भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरेंनी हे वाक्य उच्चारलं नाही. जमलेल्या माझ्या देशभक्तांनो अशी सुरुवात त्यांनी केली. त्यावरुन सोमवारी त्यांच्यावर भाजपानेही टीका केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना हिंदू बांधवांनो म्हणायला जीभ कचरली का? असा प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी आता खास ठाकरी शैलीत उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं होतं?

“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो हे शब्द रविवारपासून बंद झाले. हिंदू बांधवांनो-भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का? त्यांनी हे म्हणणं टाळलं त्यावरुन त्यावरुन पुन्हा लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका, त्यांची विचारसरणी हे सगलं त्यांनी (उद्धव ठाकरे) सोडलं. त्यामुळे आम्हाला त्यांना सोडावं लागलं आणि मोठा निर्णय घेत बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा निर्णय घ्यावा लागला. यांना जनतेने दोन वर्षांपूर्वीच तडीपार केलं आहे हे आम्हाला काय तडीपार करणार?” असाही बोचरा प्रश्न एकनाथ शिंदेंनी विचारला आहे.

उद्धव ठाकरेंनी आज काय उत्तर दिलं?

“आम्ही देशभक्त आहोत. १७ तारखेच्या सभेत इंडिया आघाडीचे नेते आले होते. अथांग जनसागर होता. मी नेहमी सुरुवात करतो जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, हे काही मी सोडलेलं नाही. मोदींनी तर इंडिया आघाडीला इंडियन मुजाहिदीनचं नाव त्यांनी दिलं होतं. त्यामुळे मी म्हटलं होतं जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..” मी यात काय चुकीचं बोललो?”

“मी हे बोलल्यानंतर मिंधे दाढी खाजवत तिकडे गेले ते बोलले.. काँग्रेस बरोबर हे गेले यांची भाषाच बदलली. अहो मिंधे तुम्ही मोदीभक्त, नमोभक्त झालेला आहात. आम्ही मोदीभक्त नाही आम्ही देशभक्त आहोत. नरेंद्र मोदींची पालखी वाहण्यासाठी माझ्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली नाही. जनतेच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापन केली. तुम्ही फक्त पालखीचे भोयी व्हा. मला मोदी भक्तांना हा सवाल आहे की जो मोदीभक्त आहे तो देशभक्त नाही का? जर देशभक्त असाल तर पोटात कशाला दुखतं आहे? भाडोत्री जनता पक्षाला जर असं वाटत असेल की देशापेक्षा मोदी मोठे आहेत तर ते चालणार नाही, आम्ही ते खपवून घेणार नाही.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.