मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेडमधील सभेनंतर त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी हेही चर्चेत आले आहेत. फडणवीसांनी यासंदर्भात थेट विधानसभेत मुद्दा उपस्थित केल्यामुळे त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली असून त्यावरून ठाकरे गटावरही आरोप करण्यात येत आहेत. यावरून आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नांदेडमधल्या सभेत बोलताना अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांना श्रीकांत शिंदेंच्या उल्हासनगरमधील कार्यालयावरून प्रश्न विचारले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“..हे एकदा देवेंद्रभाऊंनी तपासून पाहावं”

“उल्हासनगरच्या गोलमैदानात माझा भाचा श्रीकांत शिंदे याचं संपर्क कार्यालय कुणाच्या जागेत आहे हे एकदा देवेंद्रभाऊंनी तपासून पाहावं. श्रीकांत शिंदेचं संपर्क कार्यालय अनिल जयसिंघानीच्या जागेत आहे का? असेल तर कसं?” असा प्रश्न सुषमा अंधारेंनी केला आहे.

“२०१५ साली अनिल जयसिंघानी या पठ्ठ्यानं आपल्याकडे (तत्कालीन शिवसेना) यायचं ठरवलं होतं. उल्हासनगरमध्ये राहणारा माणूस म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतला माणूस. हा माणूस मातोश्रीपर्यंत येतो म्हणजे वेळ कुणी घेतली असेल याच्यासाठी? एकनाथ शिंदे होते. हा विचार करण्यासारखा भाग आहे की एकनाथ शिंदे आणि अनिल जयसिंघानी यांचे संबंध काय होते?” असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

“एकनाथभाऊ डायलॉग खूप मारतात, पण…”, सुषमा अंधारेंची खेडमधल्या सभेवर खोचक टीका; म्हणाल्या, “हा जोक ऑफ द डे!”

श्रीकांत शिंदेंचं कार्यालय कुठे आहे?

“देवंद्रभाऊ, हे नेमकं काय चाललंय? एकनाथ शिंदेंच्या सोशल मीडिया पेजवरून लोक काहीतरी लिहीत आहेत की देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचा कुठलातरी आर्थिक व्यवहार आहे. त्याच्या काही व्हिडीओ क्लिप आहेत. नेमकं हे खरं की खोटं? काय प्रकरण आहे? या सगळ्या कंड्या एकनाथ शिंदेंच्या लोकांकडून का पिकवल्या जात आहेत?” असा आरोपही त्यांनी केला.

“फडणवीसांचा तो मित्र म्हणजे…”

“फडणवीस असं म्हणत असतील की माझ्या मित्राने माझा गेम केला आणि दुसरीकडे उल्हासनगरला श्रीकांत शिंदेंच्या ऑफिसची जागा किरीट सोमय्यांनी चेक करायला हवी. कागदपत्र कुणाची आहेत? खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला की काय झालं? काय आहे ते नेमकं बघितलं पाहिजे. मग जर एवढी जवळीक अनिल जयसिंघानी आणि एकनाथ शिंदेंची असेल, तर फडणवीस जे म्हणत आहेत की मित्राने माझा गेम केला, तो मित्र म्हणजे एकनाथ शिंदे आहेत का? एकदा फडणवीसांना हे विचारलं पाहिजे”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray group sushma andhare targets eknath shinde on devendra fadnavis pmw
First published on: 20-03-2023 at 08:52 IST