राज्याचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी रविवारी खेडमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ही सभा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या ५ मार्चच्या सभेला प्रत्युत्तर असल्याचं बोललं जात होतं. त्याप्रमाणेच एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंवर परखड शब्दांत टीका केली. यावेळी मी गद्दार नसून खुद्दार आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या खेडमधील भाषणावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदेंच्या भाषणावर माध्यमांशी बोलताना टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“हे सरकार घेणारं नाही. हा मुख्यमंत्री देणारा आहे. देत देत आला आहे”, असं एकनाथ शिंदे कालच्या भाषणात म्हणाले होते. तसेच, “असा कुठला पक्षप्रमुख आपल्याच नेत्यांच्याबद्दल अशी कारस्थानं करू शकतो? आपल्या आमदारांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी दुसऱ्या पक्षांची मदत घेऊन कटकारस्थान करू शकतो? या जगात असा नेता कुठी मी पाहिला नाही”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

“गेल्या १० वर्षांतला हा अत्यंत चांगला विनोद”

दरम्यान, यासंदर्भात सुषमा अंधारेंनी नांदेडमध्ये माध्यमांशी बोलताना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांचा हा उन्मत्तपणा, अहंकार हा सर्वश्रुत आहे. गर्वाचे घर खाली असते. लोक उत्तरं देतील.’मी गद्दार नाही, खुद्दार आहे’ असं त्यांनी म्हणणं हा जोक ऑफ द डिकेड आहे. गेल्या १० वर्षांत हा अत्यंत सुंदर आणि चांगल्या दर्जाचा विनोद आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

“मर्यादा सोडण्याची वेळ आमच्यावर आणू नका, मी काही बोलत नाही याचा अर्थ…”, वाचा एकनाथ शिंदेंचं संपूर्ण भाषण!

“तु्म्ही लोकांना देणार असाल तर महिलांसाठी अर्ध तिकीट नाही, १२०० वरचा सिलेंडर ४०० वर आणा. जर तुम्ही देणारे असाल, तर कापसाच्या भावाचं काय झालं ते सांगा. हरभरा, गहू पिकाचं अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान यावर तुम्ही का बोलत नाहीत? जुन्या पेन्शनसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत का पोहोचत नाहीत? मला वाटतं एकनाथभाऊ डायलॉग खूप मारतात. पण त्यांचा स्क्रिप्टरायटर त्यांनी बदलायची गरज आहे”, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.

रामदास कदमांनाही चिमटा

दरम्यान, यावेळी बोलताना सुषमा अंधारेंनी रामदास कदम यांनाही चिमटा काढला. “रामदास कदम म्हणाले की बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता. आता वाघ कसा पाळला जाईल? कुत्री-मांजरं पाळली जातात. वाघ पाळला जात नाही. वाघ स्वतंत्र असतो. त्याचा स्वतंत्र बाणा असतो. रामदास कदमांना देणाऱ्यानं स्क्रीप्ट दिली. पण त्यांनी ती वाचूनही बघितली नाही. त्यांना त्या शब्दांचे अर्थही कळले नाहीत. महत्त्वाचे म्हणजे वाघ मुळूमुळू कधीच रडत नसतो”, असं त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare mocks cm eknath shinde speech in khed rally pmw
First published on: 20-03-2023 at 08:08 IST