राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि पवार कुटुंबीयांच्या विकासाविषयीच्या दृष्टीचं कौतुक केलं. मात्र, त्याचवेळी त्यांनी आपला माजी मित्र असलेल्या भाजपावर देखील टोला लगावला. यावेळी पुण्यानंतर बारामती राजकारणाचं दुसरं केंद्र बनल्याची कोपरखळी त्यांनी मारताच व्यासपीठावर बसलेल्या अजित पवार यांनी बाजू सावरत दिलेलं उत्तर देखील चांगलाच हशा पिकवून गेलं.

“विकास, विकास आणि त्याहीपुढे विकास!”

उद्ध ठाकरेंनी इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन करताना शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत पवार कुटुंबाचं कौतुक केलं. “पवार साहेबांसारखा तरणाबांड नेता… सुप्रिया तू खोटंच सांगितलं असेल सहस्त्रचंद्रदर्शन. ज्यांनी विकासाचा सूर्य दाखवला आणि अजूनही थांबायला तयार नाहीत. पवार साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत, संस्थांचं करतायत. सगळे पवार कुटुंबीय अत्यंत मनापासून त्यासाठी काम करतायत. पवार कुटुंब विकासाच्या ध्यासात रमलंय. विकास, विकास आणि विकासाच्या पुढे विकास”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“आम्हीही इतकी वर्ष तुमचे टीकाकार होतो”

राजकारणात टीकाकार असतात, असलेच पाहिजेत, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “आम्हीही इतकी वर्ष तुमचे टीकाकार होतोच. शिवसेना प्रमुख आणि पवार साहेबांची मैत्री जगजाहीर आहे. ते मला म्हणायचे की बारामतीत जाऊन एकदा ते शरद बाबू काय करतायत ते पाहायला हवं. पाठिंबा जरी देता येत नसला, तरी त्यात विघ्न आणू नये. विघ्नसंतोषी खूप आहेत. पण या कामातून जो आनंद मिळतो, तो त्या विघ्नसंतोषींना कधीच मिळणार नाही”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.

“बॉम्बचा आवाज होऊ द्या, पण धूर काढू नका”, देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला!

राजकारणातलं इन्क्युबेशन सेंटर

दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी २५ वर्ष मित्रपक्ष असलेल्या आणि आता विरोधात बसलेल्या भाजपावर खोचक शब्दांत टोलेबाजी केली. “जिद्द हवी. बदल सगळीकडे घडू शकतो हे इथे दिसून आलं. मी मनातल्या मनात विचार करत होतो, राजकारणात देखील एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असतं. आम्हीही उघडलं होतं २५-३० वर्ष. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही बघत आहात. अशा गोष्टी घडत असतात. आपलं काम आपण केलं. पुढे काय करायचं हे त्यांनी ठरवायचं असतं”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

पुण्यानंतर बारामती केंद्र!

यावेळी उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या एका विधानाचा संदर्भ देताच व्यासपीठावर बसलेल्या अजितदादांनी त्यांना हटकलं. उद्धव ठाकरे म्हणाले, “मला येताना अजित पवार म्हणाले की बारामती हे आता पुण्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं केंद्र बनेल”, तेवढ्यात अजित पवारांनी त्यांना हटकून “शिक्षणाचं” अशी मिश्किल सुधारणा सुचवली! यावरून सभागृहात हशा पिकताच मुख्यमंत्री म्हणाले, “हो शिक्षणाचं. राजकारणाचंही आहेच. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातात. आपण आपले मिळून धडा शिकवण्याचं काम करू”!