सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि बॉलिवूडमधल्या माफियांच्या दबावाखाली आहेत असा गंभीर आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा बिहारचा सुपुत्र होता. त्याच्या मृत्यू प्रकरणात चौकशीसाठी मुंबईला पोहचलेल्या बिहार पोलिसांना योग्य सहकार्य केलं जात नाही अशीही टीका सुशीलकुमार मोदी यांनी केली आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बॉलिवूड माफिया आणि काँग्रेसचा दबाव आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

बिहार पोलिसांनी शनिवारी निर्माता रुमी जाफरीची चौकशी केली. रुमी जाफरी हे रिया आणि सुशांत यांना घेऊन एका सिनेमाची निर्मिती करणार होते. मात्र लॉकडाउनमुळे चित्रपट सुरु होऊ शकला नाही. बिहार पोलिसांनी नवी मुंबईतील उल्वे येथे जाऊन सुशांत, रिया आणि शोविकच्या कंपनीची नोंदणी असलेल्या ठिकाणी केली. दरम्यान शनिवारी संध्याकाळी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांचा दबाव आहे. त्यामुळे सुशांतच्या प्रकरणात जबाबदार असलेल्या सर्व घटकांना वाचवण्यावर कल दिला जातो आहे. असं करुन बिहारमध्ये काँग्रेस जनतेला काय तोंड दाखवणार? असाही प्रश्न सुशीलकुमार मोदी यांनी उपस्थित केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सगळी हिंदी सिनेसृष्टी हादरली होती. मात्र सुशांत सिंह राजपूत हा घराणेशाही आणि सिनेसृष्टीतल्या गटबाजीचा बळी आहे असाही आरोप झाला. दरम्यान असे आरोप झाल्यानंतर त्या अनुषंगानेही चौकशी करण्यात आली आहे.