Uddhav Thackeray MNS MVA Satyacha Morcha speech : मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच महाविकास आघाडीचे शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहिले यावेळी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

ॲनाकोंडाला कोंडावंच लागेल

उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी अमित शाह याचा ॲनाकोंडा असा उल्लेख केला होता. यावरून सत्ताधारी पक्षाकडून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. यानंतर आज पुन्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मध्यंतरी मी एक शब्द वापरला तो गाजला. शोलेमध्ये एक डायलॉग आहे. दूर गांव मे जब आधी राज बच्चा रोता है, तो मां कहती है सोजा नहीं तो… तसं आज तुम्हाला सांगतोय जागे राहा नाहीतर ॲनाकोंडा आ जायेगा, या ॲनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, नाहीतर सुधारणार नाहीत.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं रोज कुठून ना कुठून पुरावे येत आहेत. मी ॲनाकोंडा का म्हणतोय? गंमत किंवा मस्करी करायची म्हणून बोलत नाही. यांची भूक शमत नाही, आपला पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं, माझे वडिल चोरायचा प्रयत्न करत आहेत. तेही पुरेसे नाही म्हणून आता मत चोरायला बघत आहेत.

मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात विरोधी पक्षांनी म्हणजे आपण कसा लाभ घेतला याचा पर्दाफाश करेन. मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच. पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलत आहेत, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलं आहे की मतचोरी झाली आहे, मतचोरी होत आहे, उसे उद्धव ठाकरे म्हणाले.

नाव हटवण्याचा प्रयत्न झाला?

मतदार यादीतील नावाच्या पडताळणीसाठी कोणीतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाने ऑनलाईन अर्ज केला असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले की, हा अर्ज २३ तारखेला केला गेला आहे. हा अर्ज सक्षम नावाच्या अॅपवरून केला गेला आहे. मी रितसर तक्रार केली आहे. हे कोणी केलं? याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओटीपी काढण्याचा प्रयत्न झाला आहे, हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. आणि कदाचित १४ आणि १५ तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर २३ तारखेला हा अर्ज केला गेला आहे. म्हणजे माझ्यासकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावे मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न गेला आहे का? हे शोधण्याची गरज आहे. कारण यात नक्की काहीतरी डाव आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्ही प्रामाणिकपणे कायदेशीर मार्ग तर अवलंबत आहोतच. येत्या काही दिवसांच सर्व पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत. न्यायालयात तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची देखील परीक्षा होईल. निवडणूक आयुक्त लाचार झालेलेच आहेत. शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात तीन-चार वर्षांपासून सुरू आहे. सर्व साक्षी-पुरावे दिल्यानंतर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी खात्री आहेच, पण नंतर जनतेचं न्यायालय या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घेण्यास सक्षम आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.