२१ जूनच्या पहाटेपासून ते ३० जूनच्या सायंकाळपर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अनेपक्षितरित्या शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे विराजमान झाले तर उपमुख्यमंत्री म्हणून राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. भाजपाने आपल्या धक्का तंत्राचा वापर करत अगदी शेवटच्या क्षणी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे आदेश दिले. तत्पुर्वी ३० जूनला दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी सरकारबाहेर राहून काम करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र त्यांनंतर अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांपर्यंत अनेकांनी फडणवीस यांनी थेट सत्तेत सहभागी व्हावं असं सांगितल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं अशी माहिती समोर आली.

नक्की वाचा >> शरद पवारांनी ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवल्याच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मग आता जे…”

पाच वर्ष राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने अशाप्रकारे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने सर्वच स्तरांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. अगदी विरोधकांनीही या मुद्द्यावरुन भाजपाला लक्ष्य केलं. आता याचसंदर्भात एकेकाळी फडणवीस यांच्यासोबत सत्तेत वाटेकरी असणारे आणि कोसळलेल्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केलंय. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

नक्की वाचा >> स्वत: उद्धव ठाकरे सूरतला गेले असते तर…? उद्धव ठाकरे बंडखोरांसंदर्भातील प्रश्नावर म्हणाले, “माझ्या मनात काही…”

“आज तुम्हाला महाराष्ट्रातील परिस्थिती हास्यजत्राचा दुसरा सिझन वाटत नाही का? ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते उपमुख्यमंत्री झालेले दिसताहेत,” असा प्रश्न राऊत यांनी मुलाखतीदरम्यान विचारला. त्यावर उत्तर देताना उद्धव यांनी स्मितहास्य करत, “उपरवाले की मेहरबानी” असं म्हटलं. यावरुन राऊत यांनी, “हा कोणता उपरवाला?” असा प्रश्न केला. उद्धव यांनी लगेच, “ज्याचं त्याला ठाऊक” असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> …तर एकनाथ शिंदे भाजपाकडे पंतप्रधान पद मागतील; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे इथले सर्वात मोठे नेते असं म्हणत राऊत यांनी प्रश्न पूर्ण करण्याआधीच उद्धव यांनी बोलायला सुरुवात केली. “त्यांच्याबरोबर असं का झालं, त्यांना असं का वागलं गेलं हे काही मला कळलं नाही. ठीक आहे, तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांच्या पक्षातले अनेक जुने जाणते आजही माझ्यासोबत संपर्कात आहेत,” असं उद्धव म्हणाले. तसचे पुढे उद्धव यांनी, “हे जुने जाणते लोक निष्ठेने भाजपामध्ये आहेत. उगाच त्यांच्याबद्दल त्यांना शिवसेनेत यायचंय वगैरे असा काही माझा फालतू किंवा पोकळ दावा नाहीय. त्यांना या गोष्टी पटत नाहीयत पण तरीदेखील ते निष्ठेने भाजपाचं काम करत आहेत,” असं म्हटलं.