Uddhav Thackeray : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून यासाठी चौकशी समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर मात्र गुन्हा दाखल झालेला नाही, यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. यादरम्यान मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
शेतकऱ्यांची संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी तुमच्याशी संवाद करायला आलोय खरा, पण तुम्हीच एवढ्या प्रभावीपणे बोलताय मला शब्दच सुचत नाहीत. आज हा माझा चौथा दिवस आहे मराठवाड्यात फिरतोय. तुम्ही जे काही मला सांगितलं, तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला काही नवीन सांगितलंत? व्यथा त्याच आहेत. पहिल्या दिवसांपासून शेतकरी हाच त्रास सांगत आहेत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारच्या कारभारावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आपला पक्ष तर चोरलाच, मतं तर चोरलीच, आता जमीनपण चोरत आहेत. काल एक प्रकरण आलं होतं… पहिल्याच दिवशी मला काही जणांनी विचारलं की तुमची प्रतिक्रिया काय, मी म्हटलं कशाला प्रतिक्रिया देऊ यात काहीच होणार नाही. एक-दोन दिवस तुम्ही सगळे बोंबलत बसाल, आम्ही पण राजीनाम्याची मागणी करू… ही चौकशी करा, ही चौकशी करू मुख्यमंत्री- कोणीही असला तर त्याची गय केली जाणार नाही, चौकशी समिती नेमतील, क्लिन चीट देतील, विषय संपला. झालंय की नाही असं?, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हे प्रकरण येण्याआधी पुण्यात आणखी एक जैन मठाचं प्रकरण आलं होतं, ते सुद्धा गेलं आता. कोणाच्या आत्महत्तेच्या प्रकरणात, आत्महत्या की हत्या? हे मिटवायला दुसरं काहीतरी वर येतं आणि ते विसरून जातो. हा कारभार बघीतल्यानंतर सरकारला मतचोरी केल्याशिवाय पर्याय नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
