Uddhav Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागले असल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. अनेक नेत्यांचे राज्यभरात दौरे सुरु असून विविध ठिकाणी मेळावे, पक्षाच्या कामांचा आढावा घेतला जात असल्याचं दिसून येत आहे. याच अनुषंगाने बुधवारी (१६ एप्रिल) शिवसेना (ठाकरे) पक्षाचा नाशिकमध्ये निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) पक्षावर जोरदार टीका केली. मात्र, या सभेत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या बूथ संघटन बांधणीचं चांगलंच कौतुक केलं. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी भर सभेत भाजपाच्या बूथ संघटन बांधणीचा प्लॅन वाचून दाखवला आणि आपण देखील अशा प्रकारची तयारी केली पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. त्यामुळे याचा अर्थ असा की भाजपाचं बूथ मॅनेजमेंट आता उद्धव ठाकरेंची शिवसेना फॉलो करणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“आपली तयारी कशी पाहिजे? या संदर्भातील मी एक फोटो काढून आणला आहे. माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचा मुंबईचा बूथ संघटन तपशील आहे. आपली देखील लोक इकडे-तिकडे असतात. असं काही नाही की त्यांची लोक आपल्याकडे असतात. त्यांच्या पक्षात देखील काय चाललंय? हे मला दररोज कळत असतं. त्यांनी बुथची मांडणी कशी केली? हे मुद्दामहून येथे सांगतो. आता माझ्याकडे सर्व विभाग वैगेरे आहे, हे सर्व मी येथे सांगणार नाही. अन्यथा ते कोणी पाठवलं हे कळेल. पण मी तुम्हाला जे सांगत आहे ते मुंबईचं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“आता भाजपाच्या बुथच्या मांडणीमध्ये जबाबदारी, त्यामध्ये नंबर एक बूथ अध्यक्ष, त्यापुढे त्या व्यक्तीचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर, त्यानंतर बूथ सरचिटणीस, त्या व्यक्तीचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर, त्यानंतर सदस्य, त्यानंतर लाभार्थी प्रमुख, मग त्याचंही नाव आणि मोबाईल नंबर, मग सदस्य क्रमांक एक, सदस्य क्रमांक दोन असे १० सदस्य आणि त्यांचे मोबाईल नंबर…, आता आपण देखील ही तयारी केली पाहिजे. तसेच पुढे एक सूचना देखील दिलेली आहे की, १२ सदस्यांमध्ये किमान ३ महिला प्रतिनिधी असाव्यात. तसेच किमान एक एसटी आणि एसी प्रतिनिधी असावा. ही त्यांची (भाजपाची) मांडणी आणि या मांडणीने ते (भाजपा) पुढे चाललेले आहेत”, असं उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना म्हटलं आहे.

“एव्हीएमचा घोटाळा आहे का? जरूर आहे, योजनांचं दारूड आहे का? आहे. पण त्याच बरोबरीने बूथ नियोजन हे देखील फार महत्वाचं आहे. तसेच बोगस मतदान, तुम्ही खात्रीने सांगू शकता का? की तुमच्याकडे एकही मतदान बोगस झालं नसेल. दरम्यान, आता जर का आपण आपले बूथ प्रमुख आणि पोलिंग एजेंट यांना आपण प्रशिक्षण दिलं तर बूथ प्रमुख हा यादीतील प्रत्येकाला नावानिशी चेहऱ्यासकट ओळखणारा पाहिजे. तसेच त्याच टीममधील एक पोलिंग एजंट पाहिजे. कारण त्यालाही कळलं पाहिजे की मतदानाला आलेला माणूस मतदानाच्या यादीतला आहे की नाही. त्याचा चेहरा जुळतोय की नाही”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या बूध मॅनेजमेंटचं कौतुक केलं.