मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. या बंडखोरीमुळे सत्तासमीकरणं बदलून गेली. सध्या राज्यात शिंदे गट-भाजपाच यांचे संयुक्त सरकार स्थापन झाले असून आगामी काळात राजकीय वर्तुळात कोणत्या घडामोडी घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मुंबईत आज (२३ ऑगस्ट) महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी आम्ही महाविकास आघाडी म्हणून अजूनही एकत्र आहोत, असे सांगितले. तसेच त्यांनी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीवरही भाष्य केले. या निवडणुका एकत्र लढायच्या की स्वतंत्र याबाबतचा निर्णय झाला की कळवला जाईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> मंत्रालयासमोरील शेतकऱ्याच्या आत्मदहनावरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका; म्हणाल्या, “ते ५० खोके…”

महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहात. मग येणाऱ्या पालिका निवडणुका तुम्ही एकत्र लढवणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना “बऱ्याच दिवसांनी आम्ही एकत्र भेटलो आहोत. एकत्र भेटल्यानंतर जरा बरं वाटलं आहे. आम्ही कुठेही फुटलेलो नसून एकत्र आहोत. त्यामुळे पुढे काय करायचं याबाबत जेव्हा निर्णय होईल तेव्हा तुम्हाला निश्चित सांगू,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> “…त्यापुढे हे संकट काय आहे?” उद्धव ठाकरेंचे सत्तासंघर्षावर महत्त्वाचे विधान; म्हणाले, “महाविकासआघाडीत…”  

शिवसेना पक्ष आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईवरदेखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही करोना महामारीच्या संकटाचा सामना केला. तर हे संकट काय आहे? करोनाचे संकट हे जगावर होते. मात्र या संकटाला महाविकास आघाडीने चांगल्या पद्धतीने तोंड दिले. मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते कारण न्यायदेवतेला सगळे समान असतात. न्यायदेवतेच्या डोळ्यावर जरी पट्टी असली तरी जनता उघड्या डोळ्यांनी सगळं बघते. न्यायदेवता आणि जनता हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. हे आधारस्तंभ जोपर्यंत मजबूत आहेत, तोपर्यंत देशात लोकशाहीच राहील. येथे बेबंदशाही येणार नाही,” असेदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.