Uddhav Thackeray on Jan Suraksha Bill : राज्य सरकारने गुरुवारी (१० जुलै) विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मांडलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारविरोधात शेतकरी, कामगार, विध्यार्थी अशा कोणालाही आंदोलने, मोर्चे काढण्याची तसेच विरोधी भूमिका मांडण्याची पूर्ण मुभा असून विरोधकांवर मनमानी पद्धतीने किंवा आकसाने कारवाई केली जाणार नाही आणि विशेष जनसुरक्षा कायद्याचा गैरवापर होणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा अपवाद वगळता सर्वच राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर झालं. मात्र, आज शिवसेनेने (ठाकरे) या विधेयकाला विरोध केला आहे.
शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “काल (१० जुलै) आणि आज विधीमंडळात जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. काल विधानसभेत मांडलं आणि आज विधानसभेत त्यावर चर्चा झाली. बहुमताच्या जोरावर हे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं. सहाजिक आहे की सत्ताधारी पक्षाकडे पाशवी बहुमत असल्यामुळे ते त्याचा उपयोग व दुरुपयोग करत आहेत. मात्र, त्या विधेयकातील काही गोष्टींना आमचा विरोध आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकारच्या कथनी व करणीत फरक दिसतोय. ते म्हणतात की आम्हाला नक्षलवादाचा, दहशतवादाचा बिमोड करायचा आहे. परंतु, या विधेयकात कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवादाचा उल्लेख नाही. सुरुवातीला फक्त कडवी डावी विचारसरणी, कडव्या डाव्या विचारांच्या संघटनांवर कारवाई असा उल्लेख आहे. मुळात डावा-उजवा कसं ठरवणार? पूर्वी आम्ही म्हणजेच शिवसेना व भाजपा एकत्र होतो. तेव्हा आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हटलं जायचं. कारण आम्ही सगळे धर्म मानणारे आहोत. परंतु, डावं-उजवं काय आहे. डावं-उजवं करण्याची गरज नाही. हे संविधानाच्या विरोधात आहे.
शिवसेनचे (उबाठा) प्रमुख म्हणाले, “आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत लिहिलंय, सर्वसमावेशकता, समानता, सामाजिक न्याय, व्यक्तीस्वातंत्र्य, मोदी देखील म्हणतात, सबका साथ सबका विकास, मग हे डावं आणि उजवं असा फरक करण्याची काय गरज? विधेयकातील मसुद्यात जे काही लिहिलंय त्यातून फरक कळत नाही. सरकारला देशविघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर त्यांनी आम्हाला विचारायची आवश्यकता नाही. आम्ही सरकारबरोबर होतो, आहोत आणि राहू. परंतु, तुम्ही राजकीय हेतूने प्रेरित विधेयक आणत असाल तर आमचा त्याला विरोध आहे. तुमच्या विधेयकाला तसा वास येतोय. हे धोकादायक विधेयक आहे.