सूड भावनेतून विरोधकांवर आरोप केले जात आहेत. तसंच भाजपाच्या विरोधात जे बोलतात त्यांना तुरुंगात जावं लागतं. आमच्यातलेही जे लोकं पक्षात घेतले आहेत त्यांच्यावर काय गोमूत्र शिंपडलं का? ते काय शुद्ध झाले का? आत्ता आमच्या लोकांच्या मागे लागला आहात ते जर तुमच्या पक्षात आले तर पवित्र झाले असं जाहीर करणार का? भाजपाचा हा सत्तापिपासूपणा आहे तो लोकांना समजला आहे असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कडाडून टीका केली आहे.

आणखी काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी?

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोध करणाऱ्यांना बेजार करायचं. आमच्या पक्षात या किंवा तुरुंगात जा हे धोरण वापरायचं. हर्षवर्धन पाटील मध्यंतरी बोलले होते ना भाजपात आलो आता मला शांत झोप लागते तशी अवस्था करायची. मध्यप्रदेशच्या मंत्र्यानेही विरोधकांना दम दिलाय की भाजपात या किंवा कारवाईच्या बुलडोझरला सामोरे जा. आता जनतेच्या मताचा बुलडोझर भाजपावर चालल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच हे सगळं जाणीवपूर्वक चाललं आहे. विरोध करणाऱ्यांना नाहक त्रास दिला जातो आहे. आमच्यातले इतके लोकं त्यांच्यासोबत गेले त्यांच्यावर आरोप करणारे भाजपाचेच लोक होते. आता ते गप्प आहेत? जे आमच्यासोबत आहेत जे भाजपाच्या विरोधात बोलतात त्यांना बदनाम केलं जातं आहे, त्यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला जातो आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच असं वक्तव्य केलं आहे की मतभेद, मनभेद विसरा. देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही आमच्या विरोधकांना माफ केलं. यानंतर चर्चा सुरू झाली आहे ती शिवसेना आणि भाजपाच्या पॅचअपची. त्यात किती तथ्य आहे असं विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, “पॅच अप करायचं म्हणजे काय करायचं? माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, त्यांच्या मनात काय आहे? ते एकदा त्यांनाच विचारा.” असं उत्तर उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिमग्याचं वक्तव्य भाजपाच्या नेत्यांबाबत केलं असेल

देवेंद्र फडणवीस जे म्हणाले की काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात. हे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या पक्षातल्या लोकांबाबतच केलं असेल कारण त्यांच्या पक्षातले काही लोक ठाकरेंच्या विरोधात रोज बोलत आहेत. ते रोज शिमगा करत असले तरीही मी सोशल मीडियावर पाहिलं कुणीतरी मुंबईत ५० खोक्यांची होळी केली. त्यामुळे आमच्या नावाने रोज शिमगा केला तरीही जनताच आता यांची होळी करेल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.