माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच कालावधीनंतर आज विधीमंडळ अधिवेशनाला हजेरी लावून कामकाजात सहभाग घेतला. विधानपरिषदेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न मांडल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीवर टीका केली. एका बाजूला शेतकरी उघड्यावर सोडलेला आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री हिंदुत्व मानणारे आहेत. म्हणून ते वारंवार देव दर्शनाला जात असतात. त्यांना नवस बोलणं आणि नवस फेडणं यासाठी वारंवार दिल्लीला जावं लागतं. आजचा दिवस गेला आहे म्हणून नवस फेडतो. उद्याचा दिवस नीट जावा म्हणून नवस करतो. म्हणूनच त्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरु आहेत, पण यात महाराष्ट्राचं भलं कुठंय? आज सुद्धा ते दिल्लीला गेले आहेत. एवढ्या दिल्लीवाऱ्यात त्यांनी महाराष्ट्राचा सीमाप्रश्न का नाही मांडला? शेतकऱ्यांना मदत देण्याचा विषय का नाही मांडला?” असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
यावेळी पत्रकारांनी संजय राऊत यांनी उल्लेख केलेल्या बॉम्बचे काय झाले? असाही प्रश्न उपस्थित केला. यावर बोलत असताना ठाकरे म्हणाले की,
बॉम्ब बरेच आहेत. त्याच्या वाती काढल्यात, फक्त त्या पेटवायचा अवकाश आहे.”
“पण सध्या आमच्यासाठी कर्नाटकमधील काही लाख मराठी माणसांचा विषय महत्त्वाचा आहे. सीमाभागातील मराठी माणसाचा अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या संघर्ष सुरु आहे. सीमाभागातील जनतेचा प्रश्न आज विधीमंडळात मांडल्यानंतर काही जण मला प्रश्न विचारत आहेत की, तुम्ही
कधी लाठ्या काठ्या खाल्ल्या. कधी तुरुंगात गेलात. मला वाटतं या गोष्टीला काही अर्थ नाही. तुम्ही जेव्हा (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) लाठ्या काठ्या खाल्ल्या तेव्हा तुम्ही आमच्यात होता. याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही गप्प बसायचे. गप्प बसू नका.”, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले.