Uddhav Thackeray हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही अध्यादेश सरकारने रद्द केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जय महाराष्ट्रचा नारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बुलंद झाला असं उद्धव ठाकरे यांनी पुन्हा म्हटलं आहे. तसंच भाजपावर जोरदार टीकाही केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्र हा नारा बुलंद झाला. हा नार बुलंद करण्यामागे शिवसेना आणि शिवसैनिक तर होतेच मात्र ज्या ज्या राजकीय पक्षांनी ज्या ज्या मराठी भाषिकांनी पक्षभेद विसरुन सहभाग घेतला त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो आहे. सरकारला शहाणपण सुचलं आहे की नाही? हे येत्या काही दिवसांत समजेलच, पण हिंदी सक्तीचा जीआर सध्या रद्द केला आहे. जर सरकारने तो रद्द केला नसता तर ५ जुलैच्या मोर्चात भाजपामधले, एसंशि गटातले, अजित पवार गटातले मराठी प्रेमी सहभागी होणार होते आणि होणारही आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मातृभाषेचं प्रेम पक्षाच्या पलिकडे असलं पाहिजे.
समिती कुठलीही असूदेत पण सक्तीचा विषय संपला आहे-उद्धव ठाकरे
सरकारने एक समिती नेमली आहे त्यात समितीत नरेंद्र जाधव यांच्या पांडित्याचा आणि बुद्धिमत्तेचा आदर करुन मी हे सांगतो आहे की तुम्ही अशी थट्टा करु नका. कारण हा शिक्षणाचा विषय आहे. शिक्षण विषयात तुम्ही अर्थतज्ज्ञांची समिती नेमली आहे. समिती कुठलीही असूदेत पण सक्ती हा विषय आता संपला आहे. महाराष्ट्रावर हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
५ जुलैला विजयी मेळवा की मोर्चा ते दोन दिवसांत स्पष्ट करणार-उद्धव ठाकरे
५ जुलैला विजयी मेळावा किंवा मोर्चा काय ते मी दोन ते तीन दिवसांत सांगतो. मराठी द्रोही जे डोकं वर काढतात ते आपण चेपलं आहे. पण आपल्या एकजुटीसाठी संकटाची वाट न पाहता ती अशीच कायम ठेवू म्हणजे असे लोक पुन्हा फणा वर काढणार नाहीत. ५ जुलैला विजयी उत्सव साजरा होणार आहे. मराठी माणसाची एकजूटच तुम्हाला त्या वेळी पाहण्यास मिळेल. मराठी आणि अमराठी वाद सरकारला घडवून आणायचा होता. मात्र त्यात त्यांना यश आलेलं नाही, त्यामुळे जीआर रद्द करण्यात आला असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.