Uddhav Thackeray महाराष्ट्रात सध्या हिंदी सक्तीचा मुद्दा गाजतो आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह विरोधकांनी एकत्र येऊन या संदर्भातल्या जीआरची प्रतीकात्मक होळी केली. पावसाळी अधिवेशन सुरु होतं आहे. त्याआधीच विरोधकांकडून हा पवित्रा घेण्यात आला. हिंदी विषय पहिलीपासून सुरु करण्याबाबतचा जो सरकारचा अध्यादेश आहे त्याची आज प्रतीकात्मक होळी मुंबईत करण्यात आली. यासाठी उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस या तीन पक्षांचे म्हणजेच महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. या प्रतीकात्मक होळीनंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्ही जीआरची होळी केली आहे त्यामुळे हा जीआर मानतच नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं आहे?

“आम्ही सरकारवर दबाव वगैरे आणलेला नाही. आम्ही हा सरकारचा जीआर मानतच नाही. आम्ही आमच्याकडून हा विषय संपवला आहे आणि जीआरची होळी केली आहे. त्यामुळे जीआर आहे असं मानायचं काही कारण नाही. हिंदीला विरोध नाही, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. ” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

अजित पवारांनी धाडस दाखवलं याचं कौतुक आहे-उद्धव ठाकरे

मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये असं जर अजित पवार म्हणत असतील तर आनंदाची गोष्ट आहे. कुणीतरी एक माणूस धाडस दाखवतो आहे. सगळेच गुलाम झालेले नाहीत ही कौतुकाची गोष्ट आहे. मोर्चा कशासाठी काढावा लागतो आहे त्यांच्या लक्षात आलेलं नाही. सगळ्यांचीच मुलं मोठी होत असतात. लहान वयात त्यांच्या मनावर किती भार टाकणार? हा विषय महत्त्वाचा आहे. आम्ही आमच्या सरकारने अभ्यास गट अभ्यास करण्यासाठीच तयार केला होता. अभ्यास न करता हा निर्णय अचानक लादला का गेला? हिंदी भाषेचा निर्णय लादण्याचा हा दुराग्रह कुणाचा आहे? हे अजित पवारांनी जाहीर करावं असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ५ जुलैचा आमचा मोर्चा महाभव्य असणार आहे. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Marathi news About Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या अध्यादेशाची होळी केली. (फोटो-उद्धव ठाकरे, शिवसेना, एक्स पेज)

५ जुलैच्या दिवशी शिवसेना आणि मनसेसह विरोधकांचा मोर्चा

पहिलीपासून हिंदी विषय आणला गेल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष सरकारच्या विरोधात एकवटले आहेत. ५ जुलै या दिवशी या निर्णयाच्या विरोधात मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसतील असं संजय राऊत यांनीही म्हटलं आहे. दरम्यान महाविकास आघाडीतले इतर पक्षही या मोर्चात सहभागी होणार आहेत. आमचा मोर्चा महाभव्य मोर्चा असेल असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे. आता अधिवेशन सोमवारपासून सुरु होतं आहे. त्यातही हा मुद्दा गाजणार यात शंकाच नाही. त्याआधी उद्धव ठाकरेंनी हिंदी भाषेचा निर्णय लादण्याचा दुराग्रह कुणाचा आहे हा सवाल केला आहे.