उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण करत विविध मुद्द्यांना स्पर्श केला. तसंच राज ठाकरेंशी युती होणार की नाही? याबाबतही भाष्य केलं. एवढंच नाही तर महाराष्ट्रात जो चिखल झाला आहे त्याला जबाबदार कमळाबाई आहे असं म्हणत भाजपाव टीका केली. तुम्ही तुमचं हिंदुत्वाचं ढोंग आणि सोंग थांबवा असंही उद्धव ठाकरे भाजपाला उद्देशून म्हणाले आहेत.

राज ठाकरेंबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? असं कुणीतरी विचारलं. मी ५ जुलैलाच उत्तर दिलं आहे. एकत्र आलो आहे ते एकत्र राहण्यासाठी. आमचा विरोध हिंदीला नाही. पण मराठीवर अन्याय होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. भाषावर प्रांत रचना झाल्यानंतर मराठी माणसांना महाराष्ट्र मिळाला. महाराष्ट्रासाठी मुंबई ही रक्त सांडून मिळवली आहे. ती तुम्ही व्यापाऱ्यांच्या खिशात घालणार असाल तर आम्ही तुमचे खिशे फाडून आम्ही बाहेर येऊ. आम्हाला कुणाचं उणंधुणं काढायचं नाही. पण आमच्या वाट्याला गेलात तर आम्ही गप्प बसणार नाही.

आता भ्रष्टाचारपे चर्चा सुरु करा-उद्धव ठाकरे

आम्हाला प्रश्न विचारावेच लागतील. चायपे चर्चा २०१४ ला सुरु केली होती. आता पहिली चर्चा चहावरच सुरु करा. २०१४ ला चहाची किंमत काय होती आता काय आहे. दूध टाकलं की जीएसटी लागतो, साखर टाकली की जीएसटी लागतो. पाणी टाकलं की कमी होतो काय चाललं आहे? आता भ्रष्टाचारपे चर्चा सुरु करा. मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. ही मागणी मान्य केली नाही तर आम्ही आंदोलन उभं करु असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

भाजपाला इशारा देतो आहे की..

भाजपाला आज इशारा देतोय की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका आम्ही तुमचे टोप्या घातलेल्या फोटोंचं प्रदर्शन लावल्याशिवाय राहणार नाही. मुस्लिम भगिनींकडून राखी कधी बांधायची आणि बटेंगे तो कटेंगे कधी करायचं हे भाजपावाल्यांनी त्यांच्या वरिष्ठांना विचारा असंही उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात गोमाता आणि शेजारच्या राज्यात जाऊन खाता? हे तुमचं हिंदुत्व आहे का? हिंदुत्वाचं ढोंग आणि देशभक्तीचं सोंग हे आता सोडा. प्रत्येकवेळी आग पाखडण्याची गरज नाही. जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करा, चिखल करु नका.

कमळाबाईच्या कारभाराने स्वत:ची कमळं फुलवून घेतली

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजपाच्या कारभारावरही टीका केली. अनेकजण सांगत होते की आजचा मेळावा कसा घेणार. मी सांगत होतो की नेहमी जसा मेळावा घेतो, तसाच यंदाही मेळावा घेणार. उलट मी सांगायचो की यावेळी मोठा मेळावा होणार. असा जो चिखल झाला आहे, त्याला कारणीभूत ही कमळाबाई आहे. तुम्ही म्हणाल की पाऊस आणि कमाळाबाईचा काय संबंध आहे. पण कळाबाईच्या कारभाऱ्याने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. बाकीच्यांच्या आयुष्याचा चिखल करून टाकला आहे, असे म्हणत भाजपाने मुंबईत चांगले काम केले नाही, असा आरोप केला.