Uddhav Thackeray Speech at Maharashtra Assembly Monsoon Session : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ येत्या २९ ऑगस्ट रोजी (४४ दिवसांनी) पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांच्या निरोपादाखल आज (१७ जुलै) विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणं केली. एकनाथ शिंदे यांनी या भाषणात अंबादास दानवे यांचं कौतुक केलं. पाठोपाठ विधान परिषद सदस्य उद्धव ठाकरे यांनी देखील यावेळी भाषण केलं. या भाषणावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “अंबादास दानवेंच्या उमेदवारीला विरोध करणारेच आज त्यांचं कौतुक करत आहेत, हे पाहून आनंद झाला.”

उद्धव ठाकरे म्हणाले, “अंबादास दानवे हे त्यांचा या सभागृहातील पहिला कार्यकाळ पूर्ण करत आहेत. यानिमित्त त्यांनी आज सभागृहात ‘मी पुन्हा येईन’ असं जोरात बोललं पाहिजे. कारण त्याला महत्त्व आहे. फक्त ‘आहे त्याच पक्षातून’ असंही बोला. आज अनेकजण अंबादास दानवे यांचं कौतुक करत आहेत. मात्र, काही वर्षांपूर्वी मी दानवे यांना उमेदवारी दिली तेव्हा त्यांचे चेहरे वेगळे होते.”

उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांना कोपरखळी

शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभागृहात उपस्थित नाहीत. परंतु, मी अत्यंत मोकळेपणाने व जाहीरपणे त्यांचे आभार मानतो. मी प्रांजळपणे कबूल करतो की भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता तुम्ही मला दिलात आणि मी तो आमच्या पक्षात घेतला. मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, तसे ते माझे आभार मानू शकतील की नाही हे मला माहिती नाही. कारण माझ्याकडून त्यांनी काही लोक घेतले आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज सकाळी अंबादास दानवे यांनी आंदोलन केलं. त्या आंदोलनातील भेटवस्तू मुख्यमंत्र्यांना द्यायची आहे तो भाग वेगळा. मात्र, मला या यशस्वी कारकिर्दीसाठी अंबादास दानवे यांचा अभिमान वाटतो. शिवसेनाप्रमुखांना (दिवंगत बाळासाहेब ठाकरे) देखील त्यांचा अभिमान वाटत असेल, काहीशी हळहळही वाटत असेल. सहाजिक आहे की आपण किती शिकलो यापेक्षा आपण काय शिकलो याला अधिक महत्त्व आहे. त्याचा जममाणसांसाठी काय उपयोग करून देतो हे देखील महत्त्वाचं आहे.”