Uddhav Thackeray to CM Devendra Fadnavis demands Loan Waiver assistance of Rs 50000 per hectare for affected Farmers : राज्यातील वेगवेगळ्या भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावासाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी केली जात आहे. यादरम्यान मराठाड्यातील शेतकर्‍यांची भेट घेऊन परतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत एकूण परिस्थितीची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांसाठी दोन महत्त्वाच्या मागण्या देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारकडे केल्या आहेत.

आम्ही पंचांग काढून बसलो नाही

उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या दोन-तीन वर्षातील १४ हजार कोटींची जाहीर केलेली मदत अजूनही सरकारपर्यंत पोहचली नाही. २०१७ च्या कर्जमाफीची अजूनही प्रतिक्षा आहे. त्यानंतर आमचे सरकार आलं, मी कर्जमुक्ती केली. इतरही वेळेला संकट आलं तेव्हा आम्ही पंचांग काढून नाही बसलो. मला यात राजकारण आणायचं नाही, पण जर केवळ शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या, त्यांना मदत करा, यामध्ये मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल तर त्यांनी ते जरूर राजकारण समजावं.

उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याला राजकारण करू नका असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका देखील केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण बघीतलं असेल की मुख्यमंत्री तिथे गेल्यानंतर ज्या शेतकर्‍याने मदत नेमकी कधी आणि किती करणार एवढं विचारल्यानंतर त्याला ये बाबा राजकारण करू नको, आणि त्याच्यामागे पोलिस लागले. ही कुठली लोकशाही? कुठलं सरकार आहे? कशासाठी तुम्ही राज्य करत आहात? असे उद्धव ठाकरे म्हणाले.

साधारणपणे १४ हजार कोटींची जाहीर झालेली रक्कम अजून शेतकऱ्यांच्या हातात मिळालेली नाही. म्हणून आमची मागणी अशी आहे की शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्त केलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या प्रमाणे पंजाबमध्ये त्यांनी हेक्टरी ५० हजार रुपये, कालबद्ध कार्यक्रम करून जाहीर केले आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारने देखील हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करावी असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“आज मी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतो की, तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करा, तुम्ही शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ जाहीर करून ते कालबद्ध पद्धतीने त्याचे वाटप करा. बँकाच्या शेतकऱ्यांना जात असलेल्या नोटीसा थांबवा,” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावेळी केली.