महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून करोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जतनेला सावधानतेचा इशारा दिलाय. लॉकडाउनसोबतच उद्धव यांनी करोनासंदर्भातील नियमांचे पालन जनतेने करावं असं आवाहन केलं आहे. मात्र त्याचबरोबर त्यांनी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही हे सांगताना जनतेने काय काळजी घ्यावी यासंदर्भातील इशाराला दिलाय. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करण्याची गरज लागू शकते, असंही उद्धव म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये उद्धव यांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील जनतेला लसीसंदर्भात मनात कोणताही संभ्रम न ठेवता लस टोचून घेण्याचं आवाहन केलं. करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी, “मी विनंती करतो की जे पात्र आहेत त्यांनी लसीकरण करुन घ्यावं आणि सर्वाजनिक ठिकाणी नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी,” असं म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, “सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि हात धुणे हे नियम पाळावे लागतील. आपल्याला कदाचित पाहिल्यापासून सुरुवात करावी लागले. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. ती जाऊ नये असं वाटत असेल तर ही बंधनं पाळणं अत्यावश्यक आहे,” असंही उद्धव यांनी म्हटलं आहे.

औरंगाबादमध्ये निर्बंध असतानाही लोक बाहेर फिरत असल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरे यांनी, “काही ठिकाणी कडक लॉकडाउन करावा लागेल. येत्या एक दोन दिवसांत आम्ही निर्णय घेणार आहोत. गरज वाटेल तिथे लॉकडाउन करावा लागेल,” असं स्पष्ट केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. काही ठिकाणी आठवडा बाजार बंद करण्यात आलेत तर काही ठिकाणी शनिवार रविवारी दुकानं बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र लवकरच लॉकडाउनसंदर्भात मोठा निर्णय जाहीर होईल अशी शक्यता उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray warns people of maharashtra about spreading of corona scsg
First published on: 11-03-2021 at 14:36 IST