मी कोण आहे हे उद्धव ठाकरे ठरवतील. ते (प्रकाश आंबेडकर) जसं म्हणतात ना? की मी काही त्यांच्या पक्षाचा नाही. मी देखील वंचित बहुजन आघाडीचा नाही. मी शिवसेनेचा आहे. त्यामुळे मी कोण आहे हे उद्धव ठाकरे ठरवीतल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत कोण आहेत? असं प्रकाश आंबेडकर यांनी विचारलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांना आम्ही मानतो. मला त्यांच्या वक्तव्याबाबत काहीही बोलायचं नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्यावर व्यक्तीगत टीका केलेली नाही
प्रकाश आंबेडकरांना मी व्यक्तीगत काहीही बोललो नाही. संजय राऊत व्यक्तीगत बोलत नाही. मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून बोलतो आहे. महाविकास आघाडी टीकली पाहिजे आणि महाविकास आघाडीला तडा जाऊ नये म्हणून मी भूमिका मांडली होती. कुणाला ऐकायचं नसेल तर ऐकू नये.
मविआला तडा जाऊ नये म्हणून मी बोललो
शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. भाजपा विरोधात आम्हाला आघाडी उभी करायची असेल तर शरद पवार आमचे नेते आहेत एवढंच मी म्हणतोय. आम्हाला त्यात प्रकाश आंबेडकर हवे आहेत, ममता बॅनर्जी हव्या आहेत, मायावती हव्या आहेत. आमच्या एकीला कुठेही तडा जाऊ नये असंच मी बोललो. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचं नेतृत्त्व होतं म्हणून आम्ही सत्तेवर आलो, राहिलो. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून भाजपाने आमचा पक्ष फोडला हे प्रकाश आंबेडकरांनाही मान्य आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांविषयी आमच्या मनात खूप आदर आहे. तो कायमच असणार. प्रकाश आंबेडकरांना मी व्यक्तीगत काहीही बोललो नाही. माझ्याकडून विषय संपला असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यपालांना जावंच लागेल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जावंच लागेल. भाजपा कदाचित त्यांना सन्मानाने कसं जायला सांगायचं याचा मुहूर्त पाहात असतील त्यांच्या जागी कोण येतं आहे? कुणाला आणलं जातं आहे हे काही मला माहित नाही. मात्र जे कुणी राज्यपाल म्हणून येतील त्यांचे सूत्रधार दिल्लीतच बसलेले असतील त्याविषयी मला काही बोलायचं नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा अपमान करण्यात आला. केंद्रीय यंत्रणांचा उपयोग करून शिवसेना फोडण्यात आली. राज्यातल्या जनतेला हे काहीही आवडलेलं नाही. मविआचे ४० खासदार लोकसभा निवडणुकीत जिंकून येतील असा आम्हाला विश्वास आहे कारण लोकांमध्ये भाजपाविषयी खूप नाराजी आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.