SC on Maharashtra Satta Sangharsh Updates : सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेली चारही निरिक्षणे ठाकरे गटाच्या बाजूने होते. सुनावणी वेळीही सरन्यायाधीशांसह घटनापीठातील अन्य न्यायाधीशांनी ठाकरे गटाच्या युक्तीवादाबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. आज निकालाचं वाचन करतानाही ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागण्याचे संकेत होते. परंतु, आजचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला असून शिंदे-फडणवीस सरकार वाचलं आहे. यावरून राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाच्या फायरब्रॅण्ड नेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

“आजचा निकाल अशा पद्धतीने येणं बऱ्यापैकी अपेक्षित नव्हतं. यामध्ये बराच वेळ जातो. आता सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे प्रकरण जाईल. यामुळे या आमदारांचा कार्यकाळ पूर्ण होतो. पण तरीही, दोन तीन गोष्टी सांगितल्या गेल्या. गोगावलेंची प्रतोदपती नियुक्ती बेकायदा असेल तर बहुमत दर्शक ठरावावेळी गोगावलेंकडून व्हिप काढला गेला तो व्हिपसुद्धा बेकायदेशीर ठरायला हवा. तो व्हिप बेकायदा ठरत असेल तर जी काही मतदानं झाली ती बेकायदेशीर ठरायला हवी. एका पत्रावर राज्यपालांनी जाऊ नये. आम्ही निकाल स्वीकारतो, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

हेही वाचा >> “मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर…”, सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणावरून उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “गद्दारांना अविश्वास…”

ऑपरेशन यशस्वी पण…

“कोर्टाने जे काही मांडलं त्यामुळे शिंदे सरकार कायम राहिलं आहे. थोडक्यात काय तुमचं किडनी फंक्शन चांगलं काम करतंय. तुमचं हृदय अतिशय चांगलं काम करतंय. तुमचं फुफ्फुससुद्धा चांगलं आहे. ऑपरेशनसुद्धा १०० टक्के यशस्वी झालंय, पण रुग्णाचा मृत्यू झालाय (Operation is 100 percent succefful but patient is dead)”, असं सुषमा अंधारे मिश्किलपणे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सर्वोच्च न्यायालायने जे म्हटलं आहे त्यावर आम्हाला टिप्पणी करायची नाही. आपल्या सद्सद् विवेकाचा आवाज मोठा असतो. कोणीतरी ढकलून देण्यापेक्षा आपणच ती जागा सोडणं महत्त्वाचं असतं. या अर्थाने उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय आम्हाला आजही योग्य वाटतो. भलेही यावर सर्वोच्च न्यायालयाने काहीही निरिक्षण नोंदवलं असेल, पण इथिक्सच्या बाजूने जो निर्णय घेतला तो निश्चितपणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि राजकारणाचा स्तर राखण्यासाठी जो निर्णय घेतला तो योग्य होता”, असंही सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या.