ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज हिंगोलीत निर्धार सभेच्या निमित्ताने गेले असून तेथे त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर घणाघात करतानाच भाजपावरही टीकास्र डागलं. “अजून किती डबे लागणार आहेत. मालगाडी होतेय यांची”, अशा शब्दांत त्यांनी शाब्दिक प्रहार केला. तसंच, भाजपातील निष्ठावान कार्यर्त्यांनाही त्यांनी साद घातली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “आमचं हिंदुत्त्व हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्त्व आहे. पण भाजपामध्ये चाललं आहे की राम श्रीराम राम श्रीराम. सगळे आयाराम. या पक्षातून हा घे, त्या पक्षातून तो घे. पण मला दया येते ती भाजपाच्या कार्यकर्त्यांची. भाजपासोबत २५-३० वर्षे होतो. भाजपाकडे अनेक निष्ठांवत कार्यकर्ते आहेत, ज्यांनी कुटुंबियांकडे न पाहता पक्षासाठी आयुष्य झिजवलं. कधीतरी आपला भगवा फडकेल या आशेवर. यांचा भगवा फडकलाही. पण हे राहिले दांड्यापुरते आणि भगवा फडकवताहेत दुसरेच. काय उपयोग त्यांचा?” असा सवाल त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना केला.

हेही वाचा >> “गद्दाराला नाग समजून पूजा केली, पण…”, उद्धव ठाकरेंचा संतोष बांगरांवर हल्लाबोल

“व्यासपीठावर सतरंज्या घातल्या आहेत. भाजपामध्ये जुन्या कार्यकर्त्यांना सतरंज्या म्हणून पळावं लागतंय. यावर उपऱ्यांचा नाच चालू आहे. आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते सतरंज्या होऊन पडलेले आहेत. एवढ्यासाठी भाजपा वाढवायला मेहनत केली का?, असंही ठाकरे म्हणाले.

“मी भाजपाबरोबरची युती तोडली. तरी, प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्यांबाबत मला दया आहे. घरदार बाजूला ठेवून पक्ष वाढवत आहात. पक्ष वाढवल्यानतंर जेव्हा सत्ता येते तेव्हा उपरे येऊन बसवले तर चालेल तुम्हाला? मग मेहनत करता कशाला?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारची मालगाडी होतेय

“डबल इंजिन सरकार आणि आता त्यात अजितदादांचा एक डबा लागला आहे. अजून किती डबे लागणार आहेत? मालगाडी होतेय यांची. तुमच्या पक्षात कर्तृत्व नाही? तुम्हाला नेते माझे लागतात, वडील माझे लागतात, पक्ष फोडला, पक्ष सोडला वडील माझे वापरायचे. का तुमच्या दिल्लीतील वडिलांकडे मते मागायची हिंमत राहिली नाही? चोरणार माझे वडिल, इतर पक्षातील नेते चोरणार आणि म्हणणार आम्ही हिंदू आहोत. अरे कसले हिंदू, याला नामर्द म्हणतात. ही नामर्दांगी आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.