Uddhav Thckeray Opposes Jan Suksha Act : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने जनसुरक्षा विधेयक गुरुवारी (१० जुलै) विधानसभेत मांडलं. माकपवगळता सर्व पक्षांच्या पाठिंब्याने ते विधानसभेत मंजूर झालं आहे. आज ते विधान परिषदेत मांडण्यात आलं. मात्र, शिवसेनेने (ठाकरे) या विधेयकास विरोध केला आहे. याबाबत शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “या विधेयकात कुठेही नक्षलवाद, दहशतवाद असे शब्दच नाहीत, हे मोघम विधेयक आहे. यात सुधारणा करून परत सादर करावं, आम्ही त्यास पाठिंबा देऊ.”
उद्धव ठाकरे म्हणाले, “या विधेयकात म्हटलं आहे की एखादी व्यक्ती बेकायदेशीर कृत्य करते, एखादी व्यक्ती किंवा संघटना सार्वजनिक सुव्यवस्था किंवा शांततेचा भंग करते किंवा त्यास धोका निर्माण करते, सुव्यवस्थेसमोर संकट उभं करते. असे आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल. एखादी व्यक्ती सार्वजनिक सुव्यवस्थेत हस्तक्षेप करते किंवा एखाद्या संघटनेचा, व्यक्तीचा सार्वजनिक सुव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याकडे कल असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. परंतु, यामध्ये कुठेही दहशतवादी अथवा नक्षलवादी हा शब्द नाही. म्हणजेच याद्वारे सरकार सर्वसामान्य जनतेलाही लक्ष्य करू शकतं.”
या विधेयकाला भाजपा सुरक्षा कायदा असं नाव द्या : उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “या कायद्याद्वारे सरकार कोणालाही कधीही उचलून तुरुंगात टाकू शकतं. पूर्वी मिसा कायदा होता, टाडा कायदा होता तसाच आता हा जनसुरक्षा कायदा आणला आहे. या कायद्याचं नाव जन सुरक्षा कायद्याऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केलं पाहिजे. कारण कोणीही भाजपाविरोधात बोललं तर ते लोक आपल्याला देशद्रोही म्हणतात. म्हणूनच आम्ही सरकारला सांगितलं आहे की आम्ही या विधेयकाचं जरूर समर्थन करू. मात्र, त्यातले शब्द तुम्हाला बदलावे लागतील. त्यात सुधारणा कराव्या लागतील.
जनसुरक्षा कायद्याचा मिसा व टाडाप्रमाणे दुरुपयोग होईल; उद्धव ठाकरेंना भीती
“या विधेयकात कुठेही देशविघातक कृत्य करणारे, देशद्रोही, नक्षलवादी असा उल्लेख नाही. तो उल्लेख करा आणि पुन्हा एकदा विधेयक सादर करा, आम्ही त्याचं समर्थन करू. असं मोघम विधेयक आणाल, ज्याला काही आकार-उकार, शेंडा-बुडका नसेल त्याचं समर्थन करता येणार नाही. असं विधेयक मंजूर झाल्यास हे लोक उठसूट कोणालाही तुरुंगात डांबतील. पूर्वी मिसा कायद्याचा, टाडा कायद्याचा दुरुपयोग झाला. तसाच आता या कायद्याचा दुरुपयोग होऊ शकतो, असं स्पष्ट चित्र आम्हाला दिसतंय. सरकारने दहशतवादाचा बिमोड केला पाहिजे. परंतु, या सरकारने पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना अद्याप पकडलेलं नाही, त्यांना पकडावं. सरकारने जात-पात, धर्म, विचारसरणी न पाहता शिक्षा केली पाहिजे. परंतु या कायद्यात तसा काही उल्लेखच नाही. त्यामुळे सरकारने यात सुधारणा करायला हवी. सुधारणेसह विधेयक आणा आम्ही त्याचं समर्थन करू.”
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
“नक्षलवाद संपत आलाय, मग कायदा कोणासाठी करताय?”
उद्धव ठाकरे म्हणाले, “या सगळ्यात आणखी एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, पोलीस व निमलष्करी दलांनी देशातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आणला आहे. नक्षलवाद संपत आलेला असताना हा कायदा कोणासाठी आणला आहे? भाजपाच्या सुरक्षेसाठी?”