scorecardresearch

नुपूर शर्मा प्रकरणाशी उमेश कोल्हेंच्या हत्येचा संबंध

उमेश कोल्हे यांनी समाज माध्यमावर नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारा संदेश प्रसारीत केला होता.

nupur sharma
( संग्रहित छायचित्र )

अमरावती : येथील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांनी वादग्रस्त ठरलेल्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

गेल्या २१ जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. उमेश कोल्हे यांनी समाज माध्यमावर नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारा संदेश प्रसारीत केला होता. तपासात हत्येची घटना या प्रकाराशी संबंधित असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असून उर्वरित तपास सुरू आहे, असे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश‍ कोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलने घरी जात असताना रात्री १०.३० वाजताच्या सुमारास श्याम चौकातील घंटाघर परिसरात चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून सहा जणांना अटक केली.

यात मुदस्सीर अहमद उर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरूख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दूल तौफिक उर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान उर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२) आणि युसूफ खान बहादूर खान (४४) या आरोपींचा समावेश आहे. एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी मुदस्सीर अहमद, शाहरूख पठाण खान, अब्दूल तौफिक यांनी तब्बल तीन दिवस उमेश कोल्हे यांच्यावर पाळत ठेवली होती. उमेश कोल्हे हे दररोज रात्री दुकान बंद करून घंटाघरमार्गे घरी जातात हे‍ त्यांना लक्षात आले होते. आरोपींनी याच मार्गावर उमेश कोल्हे यांना गाठून त्यांची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.

कोल्हे यांचे हत्या प्रकरण नुपूर शर्मा वादग्रस्त प्रकरणाशी सबंधित आहे का, याचा तपास ‘एनआयए’ने करावा अशी मागणी खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली होती.नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारे संदेश प्रसारीत केल्यामुळे उदयपूर येथे एका व्यावसायिकाची हत्या करण्यात आली होती. अमरावती आणि उदयपूरच्या घटनेतील साम्यस्थळे तपास यंत्रणेला शोधावी लागणार आहेत.आरोपी कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत, उमेश कोल्हे यांना कुणाकडून धमक्या मिळाल्या याचाही शोध तपास यंत्रणेला घ्यावा लागणार आहे.

हत्या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे
उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. गृह मंत्रालयाने ‘ट्विट’द्वारे ही माहिती दिली आहे. गेल्या २१ जून रोजी अमरावतीत झालेल्या उमेश कोल्हे यांच्या निर्घृण हत्येशी संबंधित प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आला आहे. या हत्येचे षडयंत्र, संघटनांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंध याचा संपूर्ण तपास केला जाणार असल्याचे यात सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Umesh kolhe murder in connection with nupur sharma case amy