धर्माधिकारी मळा भागातील नागरिकांचा विरोध

नगर : टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील धर्माधिकारी मळा परिसरात अनाधिकृत मोबाइल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. आरोग्यावर दुष्परिणाम होण्याच्या भीतीने परिसरातील नागरिकांनी मोबाइल टॉवर उभारण्यास विरोध दर्शविला आहे. तरीही मोबाइल टॉवरचे काम सुरू आहे. हे काम थांबवून संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी पीपल्स हेल्पलाइन संघटनेने महापालिका प्रशासनाच्या विरोधात बुधवारी (दि. ५ मे) प्रेमदान चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.

धर्माधिकारी परिसरात अनधिकृत मोबाइल टॉवर उभारला जात असल्याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले, मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आंदोलन करावे लागत असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले.

शहरी रहिवासी भागात मोबाईल टॉवरच्या शंभर मीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे अभ्यासक सांगतात. विद्युत चुंबकीय लहरीचा दुष्परिणाम आरोग्यावर होतो. शहरात मनपाची परवानगी न घेता अनेक मोबाइल टॉवर उभे राहिले आहेत. धर्माधिकारी मळ्यातही टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन मोबाइल टॉवर उभे केले जात आहेत. सध्या न्यायालयाचे कामकाज बंद असल्याचा गैरफायदा घेऊन नियम धाब्यावर बसवून मोबाइल टॉवरचे काम सुरू आहे. मात्र मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटने केला आहे.

मोबाइल कंपनीकडून टॉवरच्या मोबदल्यात महिन्याला चांगले पैसे मिळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याची पर्वा न करता टॉवर उभारले जात आहेत. या टॉवरला परिसरातील नागरिकांचा विरोध असून, टॉवरमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने तातडीने हे काम थांबवून अनाधिकृत टॉवर उभारणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करावी, अन्यथा बुधवारी आंदोलन करून मोबाइल टॉवरचे काम थांबवण्याचा इशारा ललिता गवळी, वसुधा शिंदे, प्रकाश हजारे, माधवी दांगट, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले आदींनी दिला आहे.