पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात अनोळखी तरुणीचे प्रेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केला गेला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पोलादपूर तालुक्यात प्रेत सापडण्याची गेल्या दोन वर्षांतील ही पाचवी घटना असल्याने तर्कवितर्काना ऊत आला आहे.
पोलादपूर तालुक्यातील रानकडसरी येथील पोलीस पाटील ज्ञानदेव दगडू चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेनळी घाटातील दक्षिणटोक भागामध्ये दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात तरुणीचे अर्धनग्न व छिन्नविच्छिन्न अवस्थेतील कुजून उन्हात सुकलेले प्रेत दिसून आल्याची माहिती पोलादपूर पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस कर्मचारी अमित सावंत, िपगळे, दीपक जाधव, नाना म्हात्रे, आदींसोबत घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश अंधारे आणि डीवायएसपी शिवाजीराव देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या वेळी अंदाजे २५ ते ३० वष्रे वयाच्या तरुणीचे प्रेत, अंगावर भगव्या रंगाचा पंजाबी टॉप आणि हिरव्या रंगाचा पायजमा तसेच हिरव्या-भगव्या रंगाची ओढणी आणि डाव्या मनगटावर काळ्या पट्टय़ाचे घडय़ाळ आणि डाव्या अंगठय़ाजवळील बोटात अंगठी असल्याचे दिसून आले. उजव्या हातात एक मोरपिशी रंगाची प्लास्टिकची बांगडीही दिसून आली. प्रेताचा गळा ओढणीने फास बांधून आवळला असल्याचे दिसून आले.
सदर महिला कोण, तिचा मृत्यू कशाने झाला, कधी झाला, बलात्कार झाला काय, धारदार शस्त्राने अथवा मारहाण केल्याच्या खुणा दिसतात काय, कोणते हाड फ्रॅक्चर झाले आहे काय? गळफासामुळेच मृत्यू झाला काय, विषबाधेने मृत्यू झाला काय? अशा असंख्य प्रश्नांची उकल होण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन या प्रेताची उत्तरीय तपासणी तसेच शवविच्छेदन आणि रासायनिक विश्लेषण तसेच डीएनए अहवाल मिळविण्यासाठी प्रेत फोरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. दरम्यान, पोलादपूर तालुक्यात यापूर्वीही अशीच प्रेते आढळून आली असल्याने तर्कवितर्काना ऊत आला आहे. यापूर्वी कशेडी घाटात भोगाव बुद्रुक येथे एका अज्ञात नग्न पुरुषाचे खून केलेले प्रेत, मोरगिरी येथे जळलेले प्रेत, गोपाळवाडी वाकण येथे रस्त्यालगत भोसकलेले प्रेत आणि कातळी गावाच्या हद्दीत खेडबाजूला घाटाच्या संरक्षक िभतीवर ठेवलेले प्रेत आढळून येण्याच्या घटना घडल्या आहेत. यातील एकाही खुनाची अद्याप उकल झालेली नाही.