बीड : गेवराई तालुक्यातील फुलसांगवी फाट्यावर लक्ष्मण हाके यांचे छायाचित्र लावलेल्या फलकावर अज्ञातांकडून काळी शाई फेकण्यात आल्या प्रकार समोर आला आहे. १२ सप्टेंबर रोजी शिंगारवाडी फाट्यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे फलक फुलसांगवी फाट्यावर लावण्यात आले होते. याच फलकावर अज्ञातांकडून काळी शाई फेकण्यात आली.

या फलकावर सर्वच ओबीसी नेत्यांचे छायाचित्र लावलेले होते. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याच्या शासन निर्णयाचे पडसाद बीड जिल्ह्यात पुन्हा उमटायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसात मराठा – ओबीसी वाद काहीसा निवळू लागला होता.

नव्या शासन निर्णयामुळे ओबीसीमध्ये कमालीचा असंतोष आहे. नुकतेच मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक झाल्यानंतर दिलेल्या प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करण्याची मागणी केली जात आहे. नव्या निर्णयामुळे ओबीसी नेते अस्वस्थ आहेत. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मराठा – ओबीसी वाद चर्चेत येण्याची शक्यता आहे.