राज्यात रविवारी उस्मानाबादमध्ये गारपीट तर अनेक भागांत वादळी पाऊस झाल्यानंतर सोमवारीही राज्याच्या काही भागांत अवकाळी पाऊस झाला तर शहापूरमध्ये गारांचा पाऊस झाला. जळगाव जिल्ह्य़ात रविवारी वीज पडून दोनजण ठार झाले आहेत तर शहापूरमधील गारपिटीत एक मुलगी जखमी झाली आहे. नगर जिल्ह्य़ात शनिवारी वीज कोसळून सातजण दगावल्याचेही उघड झाले आहे. या पावसाने शेतकरी व बागायतदार चिंतेत आहेत.
जळगाव जिल्ह्य़ात दुपारी शेतात जेवणासाठी बसलेल्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळल्याने दोन जण ठार तर चौघे जखमी झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे घडली.
रविवारी तुरळक सरी पडू लागल्याने या मजुरांनी जेवण उरकून घेण्याचे ठरविले. त्यावेळी एक वीज जेवायला बसलेल्या मजुरांवर कोसळली. त्यात नसीम तडवी (३०) आणि सलीम तडवी (२५) दोघे जागीच ठार झाले. तर क्रेनमालक विनोद बोरसे हा गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी तत्काळ जळगाव येथे हलविण्यात आले. मुक्तार तडवी, आसिफ तडवी, विजय बैरागी या जखमींवर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर तालुक्यातील खर्डीसह आसपासच्या परिसरात सोमवारी सायंकाळी गारांचा पाऊस झाला असून त्यामध्ये कळमगाव परिसरातील बेबी मिनाज खलीफा ही दोन वर्षीय बालिका जखमी झाली आहे. ती घरात झोपली असताना गारांच्या माऱ्याने छताचा पत्रा कोसळून ती जखमी झाली. तिच्यावर शहापूर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  शहापूर तालुक्यातील खर्डी, कळमगाव, दळखण यासह आसपासच्या पाडय़ांमध्ये सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास जोरदार गारांचा पाऊस झाला असून त्यामध्ये काही घरांचे पत्रे उडाले.
बागायतदार चिंतेत
सावंतवाडी : अवेळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील शेतकरी, बागायतदारांची झोप उडाली आहे. मान्सूनचा हंगाम सुरू व्हायला सव्वा महिना बाकी असताना गेले काही दिवस ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट करत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बागायतदार धस्तावले आहेत. रविवारी रत्नागिरीमध्ये रात्री जोरदार पाऊस झाल्याने सोमवारी दिवसभर हवेतील उष्णता पराकोटीची वाढली आहे. नाखरे गावात सोमवारीही जोरदार पाऊस होऊन ४५ घरांचे नुकसान झाले तर अनेक झाडे उन्मळून पडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वीज कोसळून सात दगावले
नगर : जिल्हय़ात शनिवारी झालेल्या वादळी पावसात वीज पडून एकाच दिवशी तब्बल ७ व्यक्ती व ८ जनावरे मृत्युमुखी पडली. अनेक भागांत अवकाळी पाऊसही सुरू असून दुसरीकडे पाणीटंचाईमुळे टँकरची संख्याही वाढत असल्याची विरोधाभासी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्य़ात सध्या ६७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

मान्सून लांबणार?
लातूर : हिमालय, सिक्कीम भागातून येणारे थंड वारे दक्षिणेतून महाराष्ट्रात लातूर, उस्मानाबादमार्गे प्रवेश करतात. या वाऱ्याचे तापमान उणे २५ सेल्सिअसपेक्षा कमी आहे. वातावरणातील या बदलांमुळे यंदा मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rain hailstorm continue to hit maharashtra
First published on: 22-04-2014 at 01:17 IST