सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस आदी तालुक्यांमध्ये काही गावांत अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या काही पिकांची हानी झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात किणी गावच्या शिवारात रात्री गारपीट होऊन त्यात काढणीला आलेल्या द्राक्ष, पपई या फळबागांसह गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले. गारांचा वर्षाव सुरू होताच शेतकऱ्यांची दैना उडाली. चपळगाव, हन्नूर, चुंगी, बोरेगाव, तडवळ, नागणसूर, पानमंगरूळ,  वागदरी आदी गावांमध्ये अवकाळी पावसाने शेतक-यांची झोप उडाली होती. जेऊर येथे महेश गोगावे या शेतकऱ्याने तीन एकर क्षेत्रात पपईची बाग उभारली होती.

हेही वाचा >>> पाऊस, गारपिटीचा मारा; मराठवाडा, नंदुरबार, वाशिममध्ये पिकांना फटका, परभणीत वीज कोसळून पाच मृत्युमुखी

बागेची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच अचानकपणे झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने संपूर्ण पपईची बाग जमीनदोस्त झाली. बागेत सर्वत्र पावसाचे पाणी साचून गारपिटांचा सडा पडला होता. याच तालुक्यात शिरवळजवळ मल्लिनाथ भासगे या शेतकऱ्याचीही केविलवाणी अवस्था पाहायला मिळाली. भासगे यांच्या दोन एकर क्षेत्रातील द्राक्षबागेत गारपिट झाली आणि काढणीला आलेल्या द्राक्षांचे घड अक्षरशः मातीमोल झाले. यात लाखो रूपयांचा फटका भासगे यांना सहन करावा लागत आहे.

हेही वाचा >>> वाशीम जिल्ह्यातील काही भागात गारपिटीचा तडाखा; फळबागांचे नुकसान, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी, कण्हेर, रेडे, इस्लामपूर, माणकी आदी गावांमध्ये अवकाळी पावसापाठोपाठ गारपीट झाली. यात गहू, ज्वारीसह काढणीला आलेल्या काही पिकांची हानी झाली. करमाळा तालुक्यातही जेऊर  शेलगाव,  कडेगाव, वाशिंबे, चिखलठाण, पारेवाडी, शेटफळ या गावांच्या परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी, पेरू या नगदी पिकांसह गहू, ज्वारी पिकांचे शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत नुकसान झाले. मोहोळ तालुक्यात बेगमपूर परिसरात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ झाली. तर पंढरपूर तालुक्यातही काही ठिकाणी गारपीट झाल्याचे सांगण्यात आले. सोलापूर शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि ढगांच्या गडगडाटासह आवकाळी पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरी कोसळल्या. काही भागात उन्हातच पाऊस पडत होता.