सांगली/नाशिक : बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू असलेल्या अवकाळीने राज्य भरातील द्राक्ष बागांचे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे. प्राथिमक अंदाजानुसार एकटय़ा सांगली जिल्ह्यात हे नुकसान तब्बल ३ हजार कोटींचे असून राज्यभरातील सातारा, सोलापूर, नाशिक येथील अंदाज घेता हे नुकसान ५ हजार कोटींच्या वर असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पावसाने अनेक ठिकाणी द्राक्ष बागा आडव्या झाल्या आहेत. वेलींवरची द्राक्षे फुटून खराब झाली आहेत. या अतिवृष्टीने बागांमध्ये सर्वत्र पाणी जमा झालेले असून या पाण्यामुळे वाचलेले पीकही विविध बुरशीजन्य आजाराला बळी पडणार आहे. पाऊस उघडल्यावर या नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात होणार असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.

दिवाळीपासून थंडीच्या हंगामात कधी ढगाळ तर, कधी हलका पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदार पुरता हबकून गेला असतानाच मध्यरात्रीपासून सांगलीसह सोलापूर, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यात अवकाळीने थैमान घातले. सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, विटा, आटपाडी, पलूस, कडेगाव या तालुक्यात सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, सातारा जिल्ह्यातील खटाव, माण, फलटण, वाई तालुक्यातही मोठय़ा प्रमाणात द्राक्ष लागवड करण्यात आली आहे.

रात्रीपासून मध्यम स्वरूपात सुरू असलेल्या पावसाने मध्यरात्रीनंतर जोरधार सुरू ठेवली. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बागेमध्ये दोनदोन फूट पाणी साचले. गेल्या आठवडय़ातील अवकाळी पावसाने दमट हवामानामुळे मणीकुज, घडकुज सुरूच होती. यातून सावरत असतानाच पुन्हा पाऊस झाल्याने बागेतील घड तुटून जमीनदोस्त झाले. आगाप फळ छाटणी झालेल्या बागा पक्वतेच्या अवस्थेत असल्याने त्या वेलींचे मणी या पावसाने तडकले आहेत. सांगली जिल्ह्यातील ८० हजार एकर तर सोलापूर व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी २० हजार एकर क्षेत्रावरील बागांना अवकाळीचा फटका बसला असून सुमारे पाच हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातही या अवकाळीने द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्यातील एकटय़ा बागलाण भागातील दीड हजार हेक्टरवरील द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या बागांमधील द्राक्ष फळे तयार झालेली होती. यातील बहुतेक मालाचे सौदे देखील झालेले होते. माल काढणी होण्याच्या अवस्थेत असतानाच झालेल्या या नुकसानीने द्राक्ष उत्पादक उद्ध्वस्त झाले आहेत.

अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका सुपर सोनाका, माणिक चमन यांसारख्या द्राक्ष जातींना बसला असल्याचे आढळून येत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फळछाटणी झालेल्या बागामध्ये पाकळी कुज व सप्टेंबरमध्ये छाटणी झालेल्या बागा पाणी भरण्याच्या स्थितीत मणी तडकण्याचे प्रकार आढळून आले आहेत. प्राथमिक पाहणी केली असून नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे.

मनोज वेताळ, जिल्हा कृषी अधिक्षक, सांगली.

गेली दोन वर्षे करोनामुळे बाजारात माल कसातरी पाठवला. यंदा करोनाचा बाजारावर परिणाम होणार नाही असे वाटत असताना दिवाळीपासून सुरू असलेले बेभरवशाचे हवामान आमच्या मुळावरच उठले आहे. यंदाचे पीक तर हातचे गेले आहेच पण काढलेले कर्ज कसे फेडायचे याची धास्ती लागली आहे.

हरेश खराडे, मांजर्डे, (ता. तासगाव).

छाटणीनंतर पहिले पन्नास दिवस द्राक्षाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावे लागते. या नाजूक अवस्थेतच अवकाळीने होत्याचे नव्हते केले आहे. पीक तर गेल्यात जमा आहेच, पण औषध, मजुरीसाठी केलेला लाखो रूपयांचा खर्चही अवकाळीच्या पाण्यात गेला.

भरत चौगुले, बेडग (ता. मिरज).