देशातील २० ते ३२ टक्केमहिलांना गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका असल्याचे दिसून आले आहे. असे असूनही या आजाराचे निदान करणाऱ्या तपासण्या करून घेणाऱ्या महिलांचे प्रमाण मात्र देशात केवळ ५ टक्केआहे. ‘इंडियन कॅन्सर रजिस्ट्री’तील नोंदींवरून ‘नॅशनल टास्क फोर्स’ने हा निष्कर्ष काढला आहे. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे’च्या अध्यक्ष डॉ. भारती ढोरे पाटील यांनी ही माहिती दिली.
 हा कर्करोग ‘सव्‍‌र्हायकल कॅन्सर’ या नावाने ओळखला जातो. ह्य़ूमन पॅपिलोमा व्हायरस (एच.पी.व्ही.) या विषाणूमुळे हा कर्करोग होत असून ७० ते ८० टक्के महिलांना आयुष्यात केव्हा तरी याची लागण होण्याचा धोका असतो. या विषाणूची लागण लैंगिक संबंधांच्या वेळी एका जोडीदाराकडून दुसऱ्या जोडीदाराला होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. एच.पी.व्ही.ची लागण झाल्यावर विषाणूला विरोध करणाऱ्या अँटिबॉडीज शरीरात तयार व्हाव्यात यासाठी लसही उपलब्ध आहे. साधारणपणे ९ ते २५ या वयोगटातील मुलींना ही लस देतात. ३० वर्षांवरील महिलांनी मात्र आपल्याला एच.पी.व्ही.ची लागण तर झाली नाही ना, हे तपासून पाहण्यासाठी संबंधित तपासण्या करून घेणे गरजेचे समजले जाते.  डॉ. ढोरे पाटील म्हणाल्या, ‘‘सध्या या तपासण्या खर्चिक आहेत. मात्र त्यांचा खर्च कमी करण्यासाठी संशोधने सुरू आहेत. शास्त्रज्ञ डॉ. शंकर नारायणन हे कर्करोगाच्या निदानासाठी पर्यायी तपासण्या शोधण्यासाठी संशोधन करीत आहेत. परदेशी देशांमध्ये या कर्करोगाचे निदान करणाऱ्या तपासण्या करून घेणाऱ्या महिलांचे प्रमाण ९० टक्केआहे. यामुळे या देशांत महिलांचा प्रसूतीदरम्यान या कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण ७० टक्क्य़ांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे.’’ डॉ. ढोरे पाटील, डॉ. अनिता पाटील आणि डॉ. स्मिता जोशी यांनी राज्याच्या मावळ आणि पन्हाळा या दोन भागांमध्ये या कर्करोगाची तपासणी करणारी मोहीम विनामूल्य राबवण्यास सुरुवात केली आहे. मे २०१२ पासून या मोहिमेला सुरुवात झाली असून आतापर्यंत १५०० तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. यात दोन महिलांना कर्करोगाचे निदान झाले असून वेळीच उपचार करता आल्याने त्यांचे प्राण वाचल्याचे डॉ. ढोरे पाटील यांनी सांगितले. या तपासण्या करून घेण्यासाठी महिलांना तयार करण्यात आसपासच्या गावांत काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांचीच मदत घेतली जात आहे. येत्या पाच वर्षांत या परिसरात एकूण २० हजार महिलांच्या तपासण्या पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नोव्हेंबर महिना हा कर्करोगाच्या जनजागृतीचा महिना म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने इंडियन मेडिकल असोसिएशनने ‘पुणे रनिंग’ या संस्थेच्या सहकार्याने रविवारी (२४ नोव्हेंबर) पुण्यात एका ‘अवेअरनेस रन’चे आयोजन करण्यात आले होते. यात ४५० लोक कर्करोगाच्या जाणीवजागृतीसाठी धावले. ‘‘या कर्करोगाविषयी फारच कमी नागरिकांना माहिती असून सरकारही ही माहिती पोहोचवण्यात कमी पडत आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून ही माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचू शकेल.’’ असे डॉ. ढोरे पाटील म्हणाल्या.