सोलापूर : स्वातंत्र्य सेनानी, सहकार नेते, माजी आमदार वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानच्यावतीने येत्या रविवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात डॉ. बसवराज कोलूर (वैद्यकीय क्षेत्र), शुभांगी बुवा (सामाजिक क्षेत्र), सोमनाथ हुलगे (कृषी क्षेत्र) आणि प्रशांत जोशी (पत्रकारिता क्षेत्र) या चौघांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येकी २१००१ रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शिवदारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी ही माहिती दिली.
यंदाचा जीवन गौरव पुरस्कार विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष, हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांचे ‘सहकारापुढील आव्हाने आणि संधी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. वि.गु. शिवदारे यांचा जन्म १७ ऑगस्ट १९२६ रोजी तर मृत्यू ८ ऑगस्ट २००८ रोजी झाला. त्यांनी आपल्या सुमारे ६५ वर्षे सार्वजनिक कार्याला वाहून घेतले. सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्यलढ्यात सहभाग, विधान परिषदेत सलग १५ वर्षे आमदार व प्रतोद, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सलगपणे ४५ वर्षे संचालक आणि दोन वर्षे चेअरमन, श्री स्वामी समर्थ सहकारी शेतकरी सूत गिरणी, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, सिद्धेश्वर सहकारी बँक, सोलापूर जिल्हा सहकारी ग्राहक भांडार, दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ आदी मोठ्या संस्था वि. गु. शिवदरे यांनी स्थापन करून आदर्श कार्यपद्धती नावारूपाला आणली. या बहुसंख्य संस्था आजही नावारूपाला आल्या आहेत.
वि. गु. शिवदारे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी वैद्यकीय, समाजकार्य, शेती आणि पत्रकारिता या विषयात कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या पत्रकार परिषदेस वि.गु. शिवदारे प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. चन्नवीर हविनाळे, डॉ. बाहुबली दोशी, नरेंद्र गंभीरे, सुभाष मुनाळे, बी. व्ही. शेटे, प्रमोद बिराजदार आदी उपस्थित होते.