सोलापूर : मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा बावटा दाखविल्यानंतर निघालेली वंदे भारत एक्सप्रेस रात्री सोलापुरात पोहोचताच रेल्वे स्थानकावर अक्षरशः मोदीमय वातावरणात या नव्या गाडीचे स्वागत करण्यात आले. ‘हर घर मोदी’, मोदी है तो मुमकीन है, मोदी जैसा नेता हो, अशा घोषणांना उधाण आले होते. या स्वागताला जणू उत्सवाचे स्वरूप आले होते.

सोलापूरसाठी प्रथमच मुंबईहून वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणा यापूर्वीच झाली होती. त्यानुसार ही नवीन अद्ययावत  सुविधांनी युक्त जलदगती वंदे भारत एक्सप्रेस मुंबईहून सुटली आणि रात्री ठरलेल्या वेळेपेक्षा पाच मिनिटे अगोदर म्हणजे रात्री १०.३५ वाजता सोलापूर स्थानकावर पोहोचली आणि स्वागताच्या उत्सवाला उधाण आले. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यात भाजपसह संघ परिवारातील कार्यकर्त्यांचा जोष काही औरच होता. ढोलताशांच्या दणदणाटासह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जयजयकाराने संपूर्ण रेल्वे स्थानक दुमदुमून गेले होते. मस्तकावर भगवे टोप्या आणि गळ्यात भाजपचे ध्वजचिन्ह असलेले गमछे घालून शेकडो कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते. रात्री दहानंतर ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार वाद्ये वाजविण्यास बंदी असतानाही या आंनदी स्वागत उत्सवासाठी कायदा मोडला गेला.

रात्री नऊपासूनच रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागतासाठी गर्दीला सुरूवात झाली होती. वेळेवर वंदे भारतचे आगमन होताच स्वागताचा जोष टिपेला पोहोचला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे वंदे भारतच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर आवर्जून आले होते. खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह कुर्डूवाडीपासून वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करताना गाडीतील सर्व डब्यांमध्ये फिरून प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी मधूनच मोदी आणि भाजपच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या जात होत्या. प्रवाशांशी संवाद साधताना खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी हे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची किमया केवळ पंतप्रधान मोदी यांच्यामुळे कृतीत उतरल्याचे सांगत होते. गाडीचे दोन-तीन डबे मुंबईपासून ते कुर्डूवाडीपर्यंत रिकामेच ठेवण्यात आले होते. कारण या डब्यांतून कुर्डूवाडीपासून खासदार डॉ. जयसिध्देश्वर महाराज व त्यांचे शेकडो समर्थक सोलापूरला येणार होते. कुर्डूवाडीत हे तिन्ही डबे भरून गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन होताच सुरू झालेल्या प्रचंड जल्लोषात खासदार डॉ. जयसिध्देश्वर महाराज सहभागी झाले. गाडीच्या चालक केबीनमध्ये त्यांनी चालकाचा पुष्पहार घालून सत्कार केला. दुसऱ्या बाजूने भाजपचे कार्यकर्ते गाडीवर गुलाब फुलांचा वर्षाव करीत होते. भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम अशा आवडत्या घोषणांसह मोदी-मोदीचा घोषही घुमत होता. भाजपचे ध्वजही फडकावले जात होते. इकडे नागरिकांनाही वंदे भारत एक्सप्रेसबद्दल कुतूहल होते. त्यामुळे प्रचंड गर्दीतही तरूणाई वंदे भारत एक्सप्रेसबाहेर उभे राहून सेल्फी काढत होती.