Vantara on Madhuri Elephant Kolhapur : गुजरातमधील वनतारा पशुसंवर्धन केंद्रात नेण्यात आलेल्या नांदणी येथील जैन मठातील महादेवी (माधुरी) हत्तीच्या मागणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. ४८ तासांत तब्बल सव्वादोन लाखांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला असून त्याचे सर्व अर्ज भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पाठवण्यात आले आहेत. वनतारा पशुसंवर्धन केंद्र उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाच्या मालकीचं आहे. त्यामुळे कोल्हापूरकर रिलायन्स समुहाविरोधात आक्रमक झाले असून त्यांनी रिलायन्सच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली आहे. अशातच वनताराने महादेवी हत्तीणीवरून सुरू असलेल्या गदारोळावर प्रतिक्रिया दिली आहे.

वनताराने म्हटलं आहे की “कोल्हापूर येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ येथून अलिकडेच स्थलांतरित झालेल्या महादेवी (माधुरी) हत्तीणीसोबत असलेलं प्रेम आणि आध्यात्मिक भावनांविषयी वनतारा खूप आदर बाळगतं. आम्ही ओळखतो की तिची तिथली उपस्थिती केवळ प्रतीकात्मक नव्हती, तर अनेकांसाठी पवित्र होती. आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वनताराने ही कार्यवाही स्वतःहून केलेली नाही. ही कार्यवाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत करण्यात आली आहे, ज्याला नंतर भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली.आम्ही या स्थलांतराचे आरंभकर्ता नव्हतो, तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो, जी हिच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहे.”

पशुसंवर्धन केंद्राने म्हटलं आहे की “माधुरी हिच्या आरोग्याचे आणि दीर्घकालीन कल्याणाचे रक्षण करणे हाच आमचा एकमेव हेतू राहिला आहे. तिला आमच्या देखरेखीखाली आणण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक, जबाबदारीने आणि कायदेशीर तसेच नैतिक निकषांचे काटेकोर पालन करत पार पाडली गेली.

लोकांच्या भावनिक प्रतिसादाची आम्हाला पूर्ण जाणीव : वनतारा

“जनतेच्या तीव्र भावनिक प्रतिसादाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि आम्ही त्याबाबत मनापासून सहानुभूती बाळगतो. म्हणूनच, करुणा आणि ऐक्याच्या भावनेतून, आम्ही कोल्हापूर येथील जैन मठ व पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरू केला आहे. कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे, आम्ही माधुरी हिच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासत आहोत. ज्याद्वारे शांततामय मार्गे माधुरीच्या कल्याणासोबतच समाजाच्या भावनांचा देखील सन्मान राखला जाईल.”

“वनतारा कोणत्याही धर्म, प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही. आम्ही अशा मुक्या जीवांच्या सेवेसाठी आहोत, जे मानवी करुणेवर अवलंबून आहेत. आम्ही पारदर्शकतेस, कायद्याच्या पालनास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे करुणेला पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आम्ही जनतेला संघर्षासाठी नाही, तर माधुरी व अशा प्रत्येक प्राण्याच्या सन्मानपूर्वक व शांत आयुष्याच्या अधिकारासाठी आमच्यासोबत उभे राहण्याचे विनम्र आवाहन करतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वनतारा पशूसंवर्धन केंद्रात महादेवी हत्तीणीची उत्तम काळजी घेतली जात असून तिच्यावर वैद्यकीय उपचार देखील सुरू करण्यात आल्याची माहिती वनताराने दिली आहे.