सिंहस्थानिमित्त शहरात केंद्र व राज्यातील मंत्र्यांचे दौरे सुरू झाले असताना ११ जुलै रोजी महापालिकेतील सत्ताधारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आगमन होत असून त्यांच्या उपस्थितीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तसेच अमेरिकेतील सायकल स्पर्धा पूर्ण करणाऱ्या डॉ. महाजन बंधूंचा सत्कार करण्यात येणार आहे. मनसे नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनही होणार आहे.
राज ठाकरे यांचे शनिवारी सकाळी आगमन होणार असून सकाळी नगरसेवक अनिल मटाले यांच्या प्रभागात शाळांचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सभागृह नेते सलीम शेख यांच्या प्रभागातील रस्त्यांचे उद्घाटन तसेच कामगारांसाठी स्वस्त दरात सुरू करण्यात आलेल्या पुरीभाजी केंद्राची ते पाहणी करणार आहेत. याशिवाय नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या प्रभागातील घरकुल योजनेतील सदनिकांची चावी ठाकरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर पूल परिसरात गोदाकाठी लावण्यात आलेल्या नारळाच्या झाडांची ठाकरे पाहणी करणार आहेत, अशी माहिती मनसेच्या ‘राजगड’ या स्थानिक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various programs today in nashik presence of raj thackeray
First published on: 11-07-2015 at 03:17 IST