कल्पेश भोईर

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वसई-विरार, मीरा-भाईंदर, पालघर मिळून कचऱ्यात साडेतीन पटीने वाढ

वसई : वसई-विरार, पालघर, मीरा-भाईंदर या तिन्ही शहरात करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. यामुळे करोनावर उपचारादरम्यान निघणाऱ्या करोनाचा जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. एप्रिल महिन्यात प्रतिदिन सरासरी ८४४ किलो इतका जैववैद्यकीय कचरा गोळा होऊ लागला आहे. करोनाकाळात प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात कचरा आढळून आल्याने चित्र दिसून आले आहे.

वसई-विरार, मीरा-भाईंदर, पालघर या तिन्ही शहरात महिनाभरापासून मोठय़ा संख्येने करोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे यावर उपचार करणारी करोना केंद्रसुद्धा भरून गेली आहे. याच उपचार केंद्रातून उपचारादरम्यान पीपीई किट, मुखपट्टी, बुटांची आच्छादने, रक्ताने दूषित वस्तू, कापूस, रक्ताच्या पिशव्या, सुया, सीरिंज यासह इतर साहित्य आदी जैववैद्यकीय कचरा बाहेर निघतो याचे प्रमाण वाढले आहे.

जानेवारीत  २०४ किलो, फेब्रुवारी -१५२ किलो तर मार्च महिन्यात २३४ किलो प्रतिदिन इतका जैववैद्यकीय कचरा निघत होता. एप्रिलमध्ये झालेली रुग्णवाढ पाहता याचे ८४४ किलो प्रतिदिन इतके झाले आहे. म्हणजेच मागील महिन्याच्या तुलनेत साधारणपणे साडेतीन पटीने या जैववैद्यकीय कचऱ्यात वाढ झाली आहे.  एप्रिल महिन्यात मीरा-भाईंदर मध्ये १२ हजार ५८१ करोनारुग्ण , तर वसईत शहरी व ग्रामीण मिळून २१ हजार ३८ करोनारुग्ण तर पालघर मधून १५ हजार ९३७ एवढे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. अवघ्या एकाच महिन्यात  तिन्ही शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने करोनाचा कचरा वाढला असून तिन्ही शहरे मिळून एप्रिल महिन्यात २५.३२४ मॅट्रिक टन इतक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती जैववैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प व्यवस्थापक नीलेश पाटील यांनी सांगितले आहे. यातील सर्वाधिक कचरा हा मीरा भाईंदर शहरातून निघाला आहे. करोनाचा कहर वाढल्याने करोनावर उपचार करणाऱ्या केंद्राची संख्या वाढली आहे. सद्यस्थितीत पालघर १८, वसई विरार ३७, मीरा भाईंदर ३१ अशा एकूण ८६ केंद्रातून करोनाचा कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जात आहे.

करोनाचा कहर अधिकच वाढला आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु करोनाकाळ सुरू झाल्यापासून वर्षभरात प्रथमच अधिक प्रमाणात जैविक कचरा निघाल्याचे दिसून आले आहे.

– नीलेश पाटील, जैववैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प व्यवस्थापक पालघर