वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांची बुधवारी संध्याकाळी भांडुपमध्ये सभा झाली. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीतील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे गटाशी युती केली असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र त्यावर स्पष्ट अशी भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यावर बोलतानाच दुसरीकडे नाना पटोलेंनी स्वतंत्र निवडणुका लढवण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टोला लगावला.

केजरीवालांच्या मुंबई दौऱ्यावर टीका

आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. यासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “केजरीवालांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा नाही. दिल्ली राष्ट्रीय राजधानी करण्याचं विधेयक राज्यसभेत आलं तेव्हा मी एकटा असा होतो ज्यानं विरोध केला होता. मी म्हटलं होतं की तुम्ही भांडण सुरू करताय. दिल्लीला राजधानी केलं, तर त्यांना विधानसभा असल्याने विधानसभेचे हक्कही द्यावे लागतील. पण दिल्लीवर सरकारचं वजन राहावं म्हणून त्यांना ताकद देता येणार नाही. हे वाद कालांतराने वाढत जातील. याचा जोपर्यंत तुम्ही निर्णय लावत नाहीत, तोपर्यंत दिल्लीला राजधानी करू नये”!

लोकसभेसाठी भाजपा-शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरला? शिंदे गट राज्यात २२ जागांवर तयारी करणार, राहुल शेवाळे म्हणतात…

“केजरीवालांचं भांडण नेमकं तेच आहे की केंद्र सरकार दिल्लीवरचं नियंत्रण सोडायला तयार नाही. केजरीवाल म्हणतायत की मी विधानसभेचा प्रमुख आहे. त्यामुळे ते नियंत्रण माझ्याकडे हवं”, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

नाना पटोलेंना टोला

दरम्यान, यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोलेंना टोला लगावला. “नाना पटोले इंग्रजी चित्रपट हॉट अँड ब्लो प्रमाणे हवा कधी गरम, कधी नरम अशी वक्तव्य ते करतात. नागपुरात त्यांनी वक्तव्य केलं की काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार. मविआत बसलं की म्हणतात आम्ही एकत्र लढणार. त्यामुळे हा फसवण्याचा जो भाग आहे, त्याचं टार्गेट कोण आहे हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावं”, असं सूचक विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंना सूचक सल्ला

“मी अनेकदा सूचना करतो. आत्ताही उद्धव ठाकरेंना सूचना केलीये की सावध राहा. आम्ही शिवसेनेबरोबर जाणार हे आम्ही त्या वेळीच जाहीर केलं आहे.त्यांचा प्रयत्न आहे की यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसही यावं. त्यासंदर्भात मी म्हटलं की नाना पटोलेंच्या वक्तव्याकडे लक्ष द्या. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती पाहून ताबडतोब ठाकरे गटानं निर्णय घेतला तर अधिक चांगलं आहे”, असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना दिला.