काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी सातत्याने वाढत चालल्याचंच चित्र आहे. मोदी आडनावाचे सगळे लोक चोर का असतात? हे वक्तव्य केल्यानंतर जो खटला त्यांच्याविरोधात दाखल झाला त्यामुळे त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द झालं. आता वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी कोर्टात राहुल गांधींच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. तसंच राहुल गांधींनी माझे आजोबा विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला आहे, त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

काय म्हटलं आहे सात्यकी सावरकर यांनी?

माझे आजोबा, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केलेल्या खोट्या आरोपांमुळे त्यांची बदनामी झाली आहे. त्यामुळेच मी राहुल गांधींच्या विरोधात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आहे असं ट्वीट सात्यकी सावरकर यांनी केलं आहे.

आपल्या ट्वीटसोबत राहुल गांधीचा एक व्हिडीओही सात्यकी सावरकर यांनी जोडला आहे. या व्हिडीओत राहुल गांधी म्हणताना दिसतात, “एक दिवस एका मुस्लीम माणसाला पाच लोकांनी मिळून मारहाण केली. त्यादिवशी वीर सावरकर यांना आनंद झाला. पाच लोक एका माणसाला मारहाण करत असतील आणि वीर सावरकरांना आनंद होतो असेल तर ती कायरता आहे. जर लढायचं असेल एकट्याने लढा. एका माणसाला पाच-सहा माणसांनी मारलं, सावरकर ही विचारधारा ठेवणारे होते” या आशयाचं एक वक्तव्य आहे. याच वक्तव्याचा संदर्भ देऊन सात्यकी सावरकर यांनी फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी माझं नाव राहुल गांधी आहे. माझं आडनाव सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही असं म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात राहुल गांधींना वीर सावरकरांचा अपमान कराल तर याद राखा असा इशारा दिला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर टीका केली. तसंच राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि वीर सावरकर यांचा गौरव करण्यासाठी वीर सावरकर गौरव यात्राही काढली होती. आता वीर सावरकर यांची बदनामी केल्या प्रकरणी सात्यकी सावरकर यांनी फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या आहेत.