राहुरी पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांनी शनिवारी पारनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येऊन बेकायदेशीर वाळूउपसा करणारी चार यंत्रे तसेच दहा वाहने पकडली, परंतु कोणतीही कारवाई न करता ती सोडून दिली. या प्रकारामुळे तालुक्यात मोठी रंगतदार चर्चा सुरू आहे.
वाळूतस्करी तसेच महसूल प्रशासनातील अधिकारी तसेच कर्मचा-यांच्या अर्थपूर्ण संबंधांविषयीच्या सुरस कथा सर्वश्रुत आहेत. आता पोलिस यंत्रणेनेही वाळूतस्करांना लक्ष्य केले असून तालुक्यातील पोलिसांबरोबरच राहुरी तालुक्यातील पोलिसांनीही तालुक्यातील बेकायदेशीर वाळूउपशाकडे वक्रदृष्टी फिरविली आहे.
गेल्याच आठवडय़ात वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षक जगदीश मूलगीर यांनी नागापूरवाडी येथे छापा टाकून मुळा नदीपात्रातील यांत्रिक उपकरणे, मोटारी तसेच ट्रॅक्टर पकडले होते. मूलगीर यांनी परस्पर कारवाई केल्याने संतप्त निरीक्षक शरद जांभळे यांनी ते ठाण्यात गैरहजर असल्याची स्टेशन डायरीत नोंद केली होती. त्यामुळे पकडलेली ही वाहने त्यांना महसूल विभागाच्या ताब्यात द्यावी लागली होती. महसूल विभागाने या उपकरणांवर तसेच वाहनांवर अद्याप काहीही कारवाई केलेली नसतानाच राहुरी पोलिसांनी पुन्हा नागापूरवाडीत उपकरणे तसेच वाहने पकडल्याने वाळूतस्कर धास्तावले आहेत. पकडण्यात आलेल्या एका यांत्रिक उपकरणाच्या मालकाचा राहुरी पोलिसांशी दरमहा संबंध असल्याने ते उपकरण सोडून देण्यात आले. उर्वरित मशीन तसेच वाहने सोडण्यासाठी ठराविक रकमेच्या तडजोडी करण्यात आल्या. चोरून वाळूउपसा तसेच वाहतूक करायची असेल तर दरमहा पोलिस ठाण्याशी संपर्क ठेवण्याची तंबीही पोलिसांनी या तस्करांना दिली.
नागापूरवाडी येथे बेकायदा वाळू वाहन नेणा-या वाहनांवर महसूल विभागाने कारवाई केली होती. या वाहनांच्या मालकांवर गुन्हेही दाखल करण्यात आल़े कारवाई सुरू असताना ही सर्व वाहने पळून गेली होती. गुन्हा दाखल होउनही ही वाहने राजरोसपणे पोलिस ठाण्यासमोरून धावत असताना पोलिस मात्र काहीही कारवाई करीत नाहीत त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नागापूरवाडीतील गेल्या आठवडय़ातील कारवाईचे गुन्हेही अद्याप दाखल करण्यात आले नाहीत. सर्व गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.