रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील झाडगाव आणि वाटद येथे उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अंतर्गत वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीचा सिलिकॉन वेफर्स, फॅब, एटीएमपी या प्रकल्पाबरोबर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील साहित्य निर्मितीच्या अशा २९ हजार ५५० कोटींच्या प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील २० हजारपेक्षा जास्त बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प प्रदूषण विरहित असणार आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सामंत म्हणाले, या दोन्ही प्रकल्पांच्या माहितीसाठी रत्नागिरीमध्ये एक कार्यालय उघडून या प्रकल्पांची माहिती देण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच एवढे मोठे प्रकल्प येत आहेत. या प्रकल्पांचे स्वागत रत्नागिरीकरांनी केले पाहिजे. वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीचा सेमी कंडक्टर बनवण्याचा प्रकल्प आहे. यातून कोणतेही प्रदूषण होणार नाही. तसेच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या अनिल अंबानी यांच्या कंपनीमार्फत धीरुभाई अंबानी यांच्या नावाने एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील साहित्य बनवणे हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. दोन्ही प्रकल्पासाठी २९ हजारपेक्षा जास्त गुंतवणूक केली जात आहे. स्टरलाइट कंपनीच्या झाडगाव येथील जागेवर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एक हजार एकर जमिनीवर प्रकल्प उभारण्यात येणार असून ही जमीन अद्यापही एमआयडीसीच्या नावावर आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही असेही सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा – Sanjay Raut: “आमदारांना जेवणातून गुंगीचं औषध दिलं, म्हणून ते…”, नितीन देशमुखांच्या दाव्यानंतर संजय राऊतांचं खळबळजनक विधान

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमार्फत उभारण्यात येणारा संरक्षण विषयक प्रकल्प हा देशातील पहिलाच सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. रत्नागिरीमध्ये असे मोठे प्रकल्प येण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे सामंत त्यांनी सांगितले. रत्नागिरीतील या दोन्ही प्रकल्पांसाठी जागा निश्चित झाली असून त्यांचे भूमिपूजनही लवकरच करण्यात येणार आहे. भूमिपूजन झाल्यापासून कमीत कमी तीन वर्षे हे प्रकल्प सुरू होण्यास लागतील. याबाबत योग्य ती खबरदारी राज्य शासनाकडून घेण्यात येणार आहे. रत्नागिरीत येणाऱ्या प्रकल्पांमुळे वीस हजारपेक्षा जास्त बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असून त्यामध्ये कुशल व अकुशल कामगारांना प्रशिक्षण टाटा कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रमार्फत देण्यात येणार आहे. एकावेळी कमीत कमी पाचशे कामगारांना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र अडीज हजार कामगारांचे प्रशिक्षण घेण्यात यावे अशी विनंंती करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण रत्नागिरीतच उपलब्ध असणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

काही लोकं बोम मारत आहेत की, महाराष्ट्रातील कारखाने गुजरातमध्ये गेले. मात्र तसे काही न होता आज वेल्लोर नावाची कंपनी आणि रिलायन्स कंपनी हजारो कोटींचा प्रकल्प रत्नागिरीत उभारण्यास तयार झाली आहे. झाडगाव येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी येथील जमीन मालकांचा योग्य विचार केला जाईल. त्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असे प्रदूषण विरहित प्रकल्प रत्नागिरीत येत असतील तर त्यांचे स्वागतच केले पाहिजे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. रत्नागिरीतील रिळ- उंडी गावातील एमआयडीसी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होत असेल तर आपण येथील लोकांशी चर्चा करण्यास तयार आहोत असे मत सामंत यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – “वांग्याची, हरभऱ्याची भाजी बनवली, भाकऱ्या थापल्या”, राहुल गांधीनी कोल्हापुरात टेम्पोचालकाच्या घरात बनवला स्वयंपाक!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्नागिरीतील चारशे कोटींच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या रविवारी करण्यात येणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील अंगणवाड्या, शाळा, दवाखाने यांच्या सुधारणेकडे जास्त लक्ष देण्यात येणार आहे. याबरोबर रत्नागिरीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात येत असून सर्व लोकांवर येथे मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. याचेही भूमिपूजन होत आहे. तसेच विश्वेश्वर मंदिर येथील भक्त निवासाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.