भूसंपादन विधेयकाला काँग्रेस विरोध करीत असला तरी याच्या मंजुरीसाठी काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले असल्याचे सांगत या विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस व इतर पक्षनेत्यांवर केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी तोंडसुख घेतले. शेतक री हिताच्या भूसंपादन विधेयकाला विरोध केला जात असेल तर विकासाचे प्रकल्प हवेत उभे करायचे का, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. नागपूर महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजना पेंच टप्पा-४ चे उद्घाटन करताना ते बोलत होते.
गेल्या ६० वर्षांत काँग्रेसने देशविकासाच्या चांगल्या योजना कधी अमलात आणल्या नाहीत आणि भाजप सरकार सत्तेवर येऊन नऊ महिने झालेले असताना अपेक्षा केली जात आहे. काळे धन कुठे ठेवले, याबाबत त्यांना माहिती आहे. ती त्यांनी द्यावी, आम्ही ते काळे धन घेऊन येतो, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजव़ळ विकासाचे व्हिजन असल्यामुळे काँग्रेसने जे ६० वर्षांत केले नाही ते पाच वर्षांत करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे.
भूसंपादन विधेयकामुळे अनेक विकासाचे प्रकल्प रखडले, हे काँग्रेसचे अनेक नेते मान्य करीत आहेत. त्या संदर्भात दोन नेत्यांची पत्रे केंद्र सरकारकडे आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विकासाचे प्रकल्प रखडले असून हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करण्याची विनंती केंद्राला केली होती. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनीही विधेयकाच्या मंजुरीसाठी केंद्राला पत्र लिहिले होते, अशी माहिती देत व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांच्या आरोपातील हवा काढण्याचा प्रयत्न केला. हे विधेयक अंबानी, अदानी यांच्यासाठी असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. अंबानी आणि अदानी गेल्या नऊ महिन्यांत मोठे झाले का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून या विधेयकावरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विधेयकातील तरतुदींवर काही सूचना असतील तर विरोधकांनी त्या केल्या पाहिजेत. कष्टक ऱ्यांसाठी नवीन मुद्रा बँक सरकार सुरू करणार आहे. महिन्यात एक रुपयाचे प्रीमियम भरल्यास २ लाखांच्या विम्याची योजना सरकार सुरू करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

    

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venkaiah naidu slams opponent
First published on: 29-03-2015 at 03:32 IST