नांदेड : प्रसिध्द कादंबरीकार, लेखक, ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबू बिरादार यांचे मंगळवारी सकाळी देगलूर येथे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले, ४ मुली, नातवंडे असा परिवार आहे.
कावड, मातीखालचे पाय, गोसावी, अग्निकाष्ठ, अंःतपुरुष, संभूती आणि आदीवास आदी कादंबऱ्यांचे त्यांनी केले. मराठवाड्यातील महत्त्वाचे कादंबरीकार म्हणून बिरादार यांची ओळख होती. त्यांची मातीखालचे पाय ही कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत एम. ए. मराठीच्या अभ्यासक्रमाला तर कावड ही कादंबरी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठंतर्गत अभ्यासक्रमात आहे.
तेलंगणाच्या सीमेवरील देगलूर तालुक्यातील काठेवाडीचा त्यांचा जन्म असल्यामुळे त्यांच्या लेखनात मराठवाडा व तेलंगण-आंध्र प्रदेशातील संस्कृती, परंपरा व ग्रामीण जीवन, ग्रामीण प्रश्नांचे प्रतिबिंब उमटलेले दिसायचे. त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, बी. रघुनाथ, यशवंतराव स्मृती साहित्य, श्री विद्या, संजीवनी, सौ. सुभद्रा सेवाभावी, कविवर्य ना. धों. महानोर, गुणीजन साहित्य संमेलन आदी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
बाबू बिरादार हे मागील दीड वर्षांपासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर देगलूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर देगलूरजवळील मंगाजीवाडी (धनगरवाडी) येथे सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
